नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश

Nashik Municipal Corporation | 13 प्रकारच्या सेवा देण्याचे बंधन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक मनपाच्या नागरी आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा तातडीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, आरोग्य संस्थांमध्ये १३ प्रकारच्या सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्राने आरोग्य आणि निरामयता केंद्रांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र तसेच 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' या संस्थांमधून आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.

यात गरोदरपण व बाळंतपणातील काळजी, नवजात शिशु आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य आजार व्यवस्थापन, किरकोळ आजार, असंसर्गजन्य रोग तपासणी, नेत्र व कान-नाक-घसा विकार, मौखिक आरोग्य, वृद्ध व उपशामक सेवा, आपत्कालीन उपचार, मानसिक आरोग्य तपासणी, योग आणि वेलनेस सेवांचा समावेश आहे.

आरोग्यसेवा प्रभावी करण्यासाठी औषधांची उपलब्धता, प्रयोगशाला तपासणी, प्रशिक्षित मनुष्यबळ, आर्थिक तरतूद आणि सक्षम पर्यवेक्षण यानाही महत्त्व देण्यात आले आहे. प्रभाग आणि शहरस्तरीय आरोग्य कृती आराखडे तयार करण्याच्या सूचना आहेत. महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती, शालेय आरोग्यदूूत, बचतगट आणि रहिवासी संघाच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.

सेवांचे उद्दिष्ट निश्चित करताना नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व सामुदायिक आरोग्य केंद्रात दररोज १५०, आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि 'आपला दवाखाना' येथे १०० बाह्यरुग्णांना सेवा देण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य यंत्रणेला सेवा गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या या निकषांवर सक्षमपणे काम करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT