Bhal To Nandivali Road Dangerous Potholes Pudhari
नाशिक

Nashik Potholes | रस्त्यांवरील 14,177 खड्डे बुजविल्याचा प्रशासनाचा दावा; नाशिक महापालिकेची युद्धपातळीवर मोहीम

Nashik Potholes | युद्धपातळीवर मोहीम : मिलिंग मटेरिअल, कोल्डमिक्ससह विविध तंत्रांचा वापर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरभर खोदलेले रस्ते आणि त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे संपूर्ण नाशिककर त्रस्त बनले असताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशांनुसार खड्डेमुक्त नाशिकची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली आहे. आतापर्यंत १४ हजार १७७ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केला आहे.

मनपा दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी १ जून ते २९ जुलै या कालावधीत शहरातील तब्बल ११ हजार ६०९ खड्डे बुजवले असून, त्यानंतर केवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २ हजार ५६८ खड्ड्यांची दुरुस्ती केली आहे.

महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सहाही विभागांमध्ये दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत.

मुख्य रस्ते, वाहतुकीची अधिक वर्दळ असलेले मार्ग आणि नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत आहेत. पावसाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन रस्त्यांच्या स्थितीनुसार जीएसबी, मुरुम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या मिलिंग मटेरिअलचा वापर करण्यात येत आहे. विशेषतः मिलिंग मटेरिअलमुळे पावसाळ्यात खड्डे अधिक प्रभावीपणे बुजवणे शक्य होत असल्याने शहरातील विविध भागांत त्याचा वापर वाढवण्यात आला आहे.

"पावसाचा जोर कायम असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असून, हवामानानुसार आवश्यक तांत्रिक उपाययोजनांचा अवलंब करून शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे."
— मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

खड्डे दुरुस्तीची मोहीम

१ जून ते २९ जुलै या कालावधीत पंचवटी विभागात सर्वाधिक ५,४८४ खड्डे दुरुस्त करण्यात आले. त्यानंतर नाशिकरोडमध्ये २,०४९, सातपूरमध्ये १,८२०, पश्चिम विभागात ८९८, नवीन नाशिकमध्ये ८५०, तर नाशिक पूर्व विभागात ५०८ खड्डे बुजवण्यात आले. तर ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीत सातपूर विभागात सर्वाधिक ८६९ खड्डे दुरुस्त करण्यात आले. पंचवटीमध्ये ४९६, पश्चिम विभागात ३५४, नवीन नाशिकमध्ये ३१४, नाशिकरोडमध्ये ३१२ आणि नाशिक पूर्व विभागात २२३ खड्डे बुजवण्यात आले.

महापौरांकडूनही झाडाझडती

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती लक्षात घेऊन महापौर हिमगौरी आडके यांनी महापौर दालनात बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांची विशेष बैठक घेतली. शहरातील विविध भागांतील रस्त्यांची स्थिती, प्रलंबित दुरुस्ती कामे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेत कामांचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ व संसाधने तातडीने वाढवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT