नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची मोहीम गतिमान केली आहे. शहरातील सहाही विभागांमध्ये नोंद झालेल्या २२ हजार ६३ खड्डे व ओघळ्यांपैकी तब्बल १८ हजार ४२३ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी केला आहे.
शहरात सद्यःस्थितीत ३ हजार ६४० खड्डे व पॅच बुजविणे बाकी आहेत. विशेषतः पंचवटी आणि नवीन नाशिक भागातील शिल्लक खड्ड्यांची संख्या मोठी असल्यामुळे महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह कायम आहे. सिंहस्थ कुंभासाठी शहरातील प्रमुख २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. डांबरी रस्ते खोदून काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे गॅस पाइपलाइनसाठी एमएनजीएलने, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ऑप्टिक फायबर केबलसाठी स्मार्ट सिटी कंपनीने तसेच जलवाहिन्या, मलवाहिका टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यातच पावसामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत सुमारे १० जणांचा बळी गेला आहे. त्यानंतरही खड्ड्यांची समस्या मात्र कायम आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, पंचवटी विभागात सर्वाधिक ६ हजार ८८२ खड्डे व ओघळ्यांची नोंद झाली. त्यापैकी ५ हजार ४९७ खड्डे बुजविण्यात आले असून, १ हजार ३८५ कामे अद्याप बाकी आहेत. नवीन नाशिक विभागात ५ हजार ८२४ पैकी ५ हजार ३ खड्डे बुजविण्यात आले असून, ८२१ खड्डे शिल्लक आहेत.
सातपूर विभागात २ हजार ८०६ पैकी २ हजार २२६, नाशिकरोडमध्ये २ हजार ८१२ पैकी २ हजार २६०, नाशिक पूर्वमध्ये २ हजार २५६ पैकी १ हजार ९३६, तर नाशिक पश्चिम विभागात १ हजार ४७९ पैकी १ हजार २५३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. अनुक्रमे ५८०, ३०४, ३२४ आणि २२६ कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.
खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने विविध साहित्य व तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये जीएसबी पद्धतीचा ९ हजार ५०७ ठिकाणी वापर करण्यात आला. याशिवाय मुरुम भरून ३ हजार १६१, मिलिंग मटेरियलचा वापर करून ३ हजार १०४, पेव्हर ब्लॉकद्वारे ४२२, एमपीएम डांबरीकरणाने ३९८, कोल्ड मिक्सने २९९ आणि डीबीएम तंत्रज्ञानाने ६३ ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे.
महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खड्डे बुजविल्याचा दावा केला असला, तरी प्रमुख रस्त्यांवर अद्याप खड्डे आणि पॅच कायम असल्याने चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्डे उघडण्याची शक्यता असल्याने दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेवरही लक्ष देण्याची गरज आहे. उर्वरित ३ हजार ६४० खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुरळीत करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे.
"आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर-आडके व आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. गणेशोत्सवापर्यंत शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील."— संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका