नाशिक : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच दि. १५ डिसेंबरला महापालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाईल, असे सांगण्यात येत होते. परंतु निवडणुकीची घोषणा किमान आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. प्रारूप मतदारयाद्यांवरील हरकतींच्या विक्रमी संख्येमुळे अंतिम मतदारयादी प्रसिद्धीला पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आता १० ऐवजी १५ डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची घोषणा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागरचना तसेच प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर नाशिकसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या प्रभागनिहाय मतदारयाद्या निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. दि. २० नोव्हेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या जाहीर केल्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
मात्र, हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच इच्छुकांकडून करण्यात आल्यानंतर हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या दरम्यान मतदारयाद्यांच्या कार्यक्रमात दोन वेळा दुरुस्ती करत सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला होता. प्रारूप मतदारयाद्यांवर नाशिकमध्ये ९,७१७ हरकती प्राप्त झाल्या. नाशिकप्रमाणेच राज्यभरातील महापालिकांच्या मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याने सर्वच महापालिकांमध्ये मतदारयाद्यांवर विक्रमी हरकती प्राप्त झाल्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन १० डिसेंबर रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्धीचे निर्देश आयोगाने दिले होते. परंतु, या हरकतींच्या पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने अंतिम मतदारयाद्या प्रसिद्धीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकांकडून राज्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तिसऱ्यांदा मतदारयाद्यांचा सुधारित कार्यक्रम जारी करत प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्यांसाठी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता १५ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
मतदान केंद्रनिहाय यादी २७ डिसेंबरला
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदारयाद्यांवरील दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्धीचा दिनांक आता १५ डिसेंबर असणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी २० डिसेंबरला तर मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या २२ ऐवजी २७ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.