Drainage Pudhari
नाशिक

Nashik Municipal Corporation | नगरसेवक निधीतील 10 लाखांपर्यंतची कामे विनानिविदा

Nashik Municipal Corporation | स्थानिक संस्था, बेरोजगार अभियंत्यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या प्रभाग विकास निधी तसेच नगरसेवक निधीअंतर्गत होणारी बांधकाम, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि उद्यान विभागातील १० लाख रुपयांपर्यंतची कामे आता विनानिविदा पद्धतीने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभा आणि स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या प्रस्तावावर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी अंतिम शिक्कामोर्तब केल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि स्थानिक मजूर सहकारी संस्थांना थेट कामे मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

यापूर्वी राज्य शासनाने तीन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांवर घातले होते. त्यामुळे स्थानिक मजूर संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळविण्यात अडचणी निर्माण होत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन नगरविकास विभागाने ८ जुलै २०२१ रोजी सुधारित आदेश काढत १० लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा पद्धतीने देण्यास परवानगी दिली होती. या शासन निर्णयाची अंमलबजावणी मनपात व्हावी, यासाठी तत्कालीन नगरसेवक योगेश हिरे यांनी तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर महासभेत या विषयावर चर्चा होऊन शासन निर्णयानुसार ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, विविध कारणांमुळे त्याची अंमलबजावणी रखडली होती.

लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर या विषयाला पुन्हा गती मिळाली. स्थायी समिती आणि त्यानंतर महासभेने प्रस्तावास मंजुरी दिली. प्रशासनाकडे अंतिम निर्णयासाठी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाला आता आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना अच्छे दिन

मनपा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार नगरसेवक निधी किंवा प्रभाग विकास निधीतून मंजूर झालेली कामेच मजूर सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देता येणार आहेत. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी विकासकामांसाठी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांना त्यांच्या निधीतील विविध कामे स्थानिक मजूर संस्था आणि बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना आता अच्छे दिन येणार आहेत.

महासभेच्या ठरावानंतर १० लाखापर्यंतची कामे विनानिविदा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे प्रभागातील दुरुस्ती स्वरूपाच्या अत्यावश्यक कामांना चालना मिळणार आहे.
हिमगौरी आडके-आहेर, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT