नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेने साडेसातशे कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी आर्थिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात राबविलेल्या अभय २ योजनेची मुदत सोमवारी (दि. ९) संपुष्टात आली. थकबाकीदारांनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या १५ दिवसांत शहरातील १३ हजार ५१६ थकबाकीदारांनी योजनेचा लाभ घेतला असून, या माध्यमातून मनपाची २८ कोटी ६३ लाखांची घरपट्टीची थकबाकी वसूल झाली आहे. योजनेद्वारे थकबाकीदारांची तब्बल १७कोटींची शास्तीही माफ झाली आहे.
मनपाच्या घरपट्टीच्या थकबाकीचा डोंगर ७५२ कोटींवर पोहोचला आहे. त्यात ३४८ कोटी केवळ शास्तीची रक्कम आहे. चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट है २६० कोटींचे देण्यात आले होते. त्यापैकी १३१ कोटींची वसुली झाली आहे.
तर ७५२ कोटींच्या थकबाकीपैकी जेमतेम ११९ कोटींची थकबाकी वसूल झाली आहे. त्यामुळे या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. महापौर हिमगौरी आहेर यांच्या सूचनेनुसार दि. २३ फेब्रुवारी ते ५ मार्च अशी अभय योजनेची मुदत होती. नंतर ही मुदत ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून थकबाकीवरील शास्तीत तब्बल ९५ टक्के सूट दिल्याने अनेक करदात्यांनी थकीत कर भरण्यास प्राधान्य दिले. परिणामी अवघ्या १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला. या मोहिमेत तब्बल १३ हजार ५१६ मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेतला असून, या कालावधीत २८ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता कर वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे.
१७ कोटींची शास्ती माफ
गेल्या १५ दिवसांत १३ हजार ५१६ थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभघेतला. त्यांच्याकडे जवळपास ४५ कोटींची थकबाकी होती. परंतु, ९५ टक्के शास्तीमाफीमुळे त्यांची १७ कोटींची शास्ती माफ झाली, तर महापालिकेच्या तिजोरीत २८ कोटी ६३ लाखांचा महसूल जमा झाला आहे. सोलर सवलत, वेळेत कर भरणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सूट यांसह विविध सवलतींमुळे नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळाला.
अभय योजनेत २८ कोटींची थकबाकी वसूल झाली असून, योजनाची मुदत आता संपली आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकीदारांनाही मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. बड्या थकबाकीदारांना आता जप्ती वॉरंट बजावले जाणार आहेत.- अजित निकत, उपायुक्त, कर विभाग