नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत उचलून नेलेली एका दिव्यांगाची स्नॅक्सची हातगाडी सोडविण्यासाठी दिव्यांगाच्या भावाकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदाराचा भाऊ दिव्यांग असून, त्याची स्नॅक्सची हातगाडी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने उचलुन नेली होती. तक्रारदाराने महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे जावून अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांची भेट घेत, भाऊ दिव्यांग असल्याचे सागंत हातगाडी परत देण्याची विनंती केली होती. तसेच हातगाडीसाठी अमृतधाम येथील हॉकर्स झोनमध्ये जागा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार उपायुक्तांनी कनिष्ट लिपिक राजेंद्र पांडूरंग भोरकडे (५२) यास हातगाडी परत देण्याचे, तसेच अमृतधाम येथील हॉकर्स झोनमध्ये हातगाडीसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले होते.
मात्र, भोरकडे याच्याकडून हातगाडी सोडण्यास टाळाटाळ केली जात होती. तसेच तक्रारदारास १८ हजार रुपये दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जात होते. मात्र, तक्रारदाराने रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने, भोरकडे याने गेल्या मंगळवारी (दि.९) तक्रारदाराकडे नऊ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती भोरकडे याने सात हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक नेहा सुर्यवंशी यांनी पथकासह गुरुवारी (दि.११) राजीव गांधी भवन येथे सापळा लावला. लाचखोर भोरकडे याने राजीव गांधी भवन येथील फेरीवाला कॅबिन बाहेरील पुरुषांचे प्रसाधनगृह येथे तक्रारदाराकडे लाचेच्या रकमेची मागणी केली असता, त्यास पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागात अशाप्रकारे गोरगरिबांची लुट सर्रासपणे केली जात असल्याची सूप्त चर्चा यानिमित्त रंगत आहे.