नाशिक : शहरातील अंतर्गत सस्ते, पूल तसेच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी सुमारे सातशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शहरातील बाढती वाहतूक, औद्योगिक वसाहतींची गरज आणि कुंभमेळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, रस्ते व वाहतूक व्यवस्थेची तातडीने सुधारणा करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी नमूद केले. रविवारी (दि. २६) नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची महापौर हिमगौरी आडके यांनी भेट घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पायाभूत सुविधा, बाहतूक व्यवस्था तसेच कुंभमेळा नियोजन या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. महापालिकेच्या वतीने शहराच्या विकासासाठी आवश्यक विविध प्रकल्प, अडचणी व प्राधान्यक्रम यांची सविस्तर मांडणी केली.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकसाठी आतापर्यंत केंद्र सरकारमार्फत उपलब्ध करून दिलेल्या निधीची माहिती दिली. तसेच, नाशिकच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्राधान्याच्या कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. अत्यावश्यक विकासकामांची सुस्पष्ट व प्राधान्यक्रमानुसार सूची तयार करून पुढील सविस्तर चर्चेसाठी शिष्टमंडळाला दिल्ली येथे पुढील बैठकीसाठी निमंत्रित केले.
नाशिकच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर कामे मार्गी लागतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. बैठकीस उपमहापौर बिलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप उपस्थित होते.
रस्ते कामांना हवी गती
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरभर रस्त्यांचे कामे सुरू असून, जागोजागी खोदकाम केल्याने, नाशिककरांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे रस्ते कामांना अधिक गती देण्याची गरज आहे. निधीअभावी रस्त्यांच्या कार्मावर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.