Tractor March (Pudhari Photo)
नाशिक

Tractor March | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा घोटीत अडवला

आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; राज्यपालांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड, सातपूर व राजूरबहुला व आडवण पारदेवी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविवारी (दि.८) दुपारी २ वाजता घोटी टोल नाका येथून मुंबईकडे नाशिक ते मुंबई ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला. सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बसने मुंबईत जाऊन पोलिस महासंचालक, राज्यपाल व वरळी येथील ईडी कार्यालयात निवेदन दिले.

दरम्यान, मंगळवारी (दि.१०) सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड घोटाळा तसेच राजूरबहुला व आडवण, पारदेवी येथील बेकादेशीर जमीन भूसंपादन करण्याबाबत तसेच चुंचाळे परिसरातील पांजरापोळची जागा एमआयडीसीने ताब्यात घ्यावी, या मागणीसाठी नाशिक ते मुंबई ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

घोटी टोलनाक्यावरून ट्रॅक्टर मोर्चा मुंबईकडे रवाना होण्यापूर्वीच घोटी पोलिसांनी ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली नाही. यानंतर घोटी पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे प्रकल्पग्रस्त शेतकरी सोमवारी सकाळी घोटी टोलनाका येथून दोन बसने मुंबईकडे रवाना झाले.

मुंबईत प्रकल्पग्रस्त शेतकरी बचाव संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, ज्ञानेश्वर चौधरी, राजू चौधरी आदींसह शेकडो शेतकऱ्यांना नवघर ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानावर आणले. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान यांच्या आदेशाने सर्वप्रथम पोलिस महासंचालक मुंबई, राज्यपाल, ईडी कार्यालय यांच्याकडे सर्व भूखंड घोटाळ्याबाबत सविस्तर चर्चा होऊन तेथेही निवेदन देण्यात आले.

परंतु एमआयडीसी कार्यालय अंधेरी येथे भेटीची वेळ न दिल्याने सर्व शेतकरी नाराज होऊन माघारी परतले. तसेच मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता नाशकातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत काय निर्णय होणार आहे, याकडे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT