Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बरड्याची वाडी येथील एका हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या मातेने तीन मुलांना दत्तक दिल्याची कबुली स्वतः दिली आहे. मुलांचे संगोपन करणे आणि त्यांना अन्न-दूध देण्यासाठी पैसे नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. मात्र, 'बाळविक्री'चा संशय बळावल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी तातडीने समिती गठीत करण्यात आली आहे.
बरड्याची वाडी येथील बच्चूबाई खंडोगे (वय ४५) यांनी १० ऑक्टोबर रोजी एका बाळाला जन्म दिला. नियमित तपासणीसाठी घरी आलेल्या आशा सेविकेला हे बाळ घरी दिसले नाही. आशा सेविकेने तातडीने वरिष्ठांना माहिती दिली, ज्यामुळे बाळ विकल्याचा संशय बळावला आणि नाशिक प्रशासनात खळबळ उडाली.
बाळविक्रीचा संशय व्यक्त होताच बच्चूबाई खंडोगे यांनी स्वतः पुढे येत बाजू मांडली. "मी ते बाळ दत्तक म्हणून दिले. नातेवाईकांनाच अर्पण केले." बच्चूबाई यांनी आतापर्यंत १२ मुलांना जन्म दिला असून, त्यापैकी तीन मुलांना दत्तक दिल्याची कबुली त्यांनी दिली.
"आमची परिस्थिती बिकट आहे. अंगावर पाजायला दूध नाही, दूध आणायची आमची ऐपत नाही. त्यामुळे मी दत्तक म्हणून दिले." बच्चूबाईंनी सांगितले की, त्यांनी आपल्या भावाकडील लोकांना दत्तक दिले आहे.
ग्रामीण रुग्णालयातून बाळाला डिस्चार्ज दिला तेव्हा त्याचे वजन ८०० ग्रॅम होते आणि नंतर घरी ३ किलो ८०० ग्रॅम वजन होते, अशी माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
हे प्रकरण समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "पोटचा गोळा पैशासाठी विकावा लागणे, यासारखे दुर्दैव या स्वतंत्र भारतात काय असेल?" असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नाशिक जिल्हा प्रशासनाने तातडीने समिती स्थापन केली असून, यामागे आर्थिक व्यवहार झाला आहे का, तसेच 'दत्तक' प्रक्रियेची कायदेशीर बाजू काय आहे, याचा तपास सुरू केला आहे. प्रशासकीय तपासातून नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.