नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा) व मनसे युतीची घोषणा ठाकरे बंधूंकडून करण्यात आल्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उबाठा-मनसे युतीतील जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. उबाठाला ७२ तर मनसेला ५० जागा मिळणार असून यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच माकप, वंचित व रासपलाही सामावून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसची अवाजवी मागणी पूर्ण करणे अशक्यप्राय दिसत असल्याने काँग्रेस वगळता महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत युतीची घोषणा केली. या घोषणेपूर्वी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी ७२ उबाठाला तर ५० जागा मनसेकडे राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत माकप, वंचित, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देखील सामावून घेतले जाणार आहे. या पक्षांच्या स्थानिक नेत्यांसमवेत जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू आहे. उबाठा व मनसेच्या कोट्यातील जागांमध्ये या छोट्या पक्षांना सामावून घेतले जाणार असून त्यानंतर अंतिम जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उबाठा-मनसे युतीची घोषणा झाल्याने महाविकास आघाडीमध्ये अन्य पक्षांनी नकार दिला तरी शिवसेना व मनसेकडून संयुक्तपणे निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली आहे.
ठाकरे ब्रॅण्डसमोर आव्हान
२०१७च्या महापालिका निवडणुकीत १२२ पैकी जेमतेम ५ जागांवर मनसेला यश मिळू शकले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी सहा जागा आल्या होत्या. ३५ जागांवर विजय मिळवत शिवसेना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. आता शिवसेना व राष्ट्रवादी दुभंगली आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जेमतेम आठ व मनसेकडे ३ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला नामोहरम करण्याचे मोठे आव्हान ठाकरे ब्रॅण्डसमोर असणार आहे.
काँग्रेसच्या सोडून आघाडी?
महाविकास आघाडीत ४५ जागांची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसकडे आता जेमतेम दोन माजी नगरसेवक शिल्लक असताना ४५ जागांची मागणी करणे अवाजवी असल्याचे महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जागांची तडजोड होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचे आडमुठेपणाचे धोरण कायम असल्याने काँग्रेस वगळता महाविकास आघाडी गठणाची तयारी केली जात आहे.