नाशिकः पुढारी वृत्तसेवा
वडाळा परिसरात एका नामांकित महिला बहुराष्ट्रीय कंपनीत कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला. भोंदू अशोक खरात प्रकरणापाठोपाठ हे नवीन प्रकरण उघडकीस आल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आठ महिलांनी विविध स्वरूपाच्या तक्रारी दिल्या आहेत.
लैंगिक शोषण, अश्लील शेरेबाजी, विनयभंग, मानसिक छळ तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. याशिवाय एका पुरुष कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाबही तपासात उघड झाली. पोलिसांकडून या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. आहे.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, पीडित महिलांनी यासंदर्भात कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयातील एचआर विभागाकडे वेळोवेळी ई-मेलद्वारे तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलांनी केला. त्यामुळे संबंधित एचआर विभागप्रमुख महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार जुलै २०२२ ते मार्च २०२६ दरम्यान सातत्याने सुरू होता. आरोपींमध्ये दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरूख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी यांचा समावेश आहे.
त्यांनी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून विविध प्रकारे त्रास दिला. यातील काही आरोपींनी महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर काहींनी कार्यालयीन परिसरात, लॉबीमध्ये तसेच मीटिंगदरम्यान अश्लील हावभाव करून वर्तन केले.
महिलांच्या शरीरावर टिप्पणी करणे, एकटक पाहणे, जाणीवपूर्वक स्पर्श करणे, वैयक्तिक आयुष्याबाबत लज्जास्पद प्रश्न विचारणे असे प्रकार सातत्याने घडत होते. काही प्रकरणांमध्ये आरोपींनी हिंदू धर्मातील देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली. पीडितांना जबरदस्तीने नमाजपठण करण्यास भाग पाडले आणि नॉनव्हेज खाण्यास भाग पाडून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकारांमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे पीडित महिलांच्या तक्रारीत नमद करण्यात आलेले आहे.
एसआयटी पथक नियुक्त
बहुराष्ट्रीय कंपनीतील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची या पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पथक तपास करत असून, आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता येत आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.