नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांची लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर या प्रकरणांमध्ये आता तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पुरुषाचे जबरदस्तीने धर्मांतर करून घेतले आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची त्याला वागणूक देण्यात आली असा असा जबाब या प्रकरणातील पीडित व्यक्तीने दिला आहे.
बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांविरोधात धार्मिक छळ, जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न, मानसिक अत्याचार व धमकी दिल्याची गंभीर तक्रार केली आहे. सन २०२२ पासून ते २३ मार्च २०२६ पर्यंत हा प्रकार सातत्याने सुरू असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत रुजू झाल्यानंतर त्याच्या टीममध्ये तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरूख शेख व रझा मेमन हे सहकारी होते. त्यापैकी तौसिफ अत्तार हा टीम लीडर असल्याने त्याच्या सूचनांचे पालन करणे भाग पडत होते. मात्र, त्याने स्वतःचे व इतरांचे काम तक्रारदारावर टाकून त्याच्याकडून अतिरिक्त काम करून घेतल्याचा आरोप आहे. याचबरोबर, कामाच्या ठिकाणी धार्मिक विषयांवरून सातत्याने चर्चा करून हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार हा धार्मिक आचार पाळणारा असून, गळ्यात रुद्राक्ष माळ धारण करत असल्याने सहकारी त्याची चेष्टा करत, 'तुझा धर्म खोटा आहे' अशा प्रकारची वक्तव्ये करून मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे.
तसेच फिर्यादीच्या देवतांबाबत अवमानकारक टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचेही त्याने म्हटले आहे. यापुढे जात, तक्रारदाराला जबरदस्तीने नमाजपठण करायला लावणे, डोक्यावर टोपी घालून फोटो काढणे व तो सोशल मीडियावर प्रसारित करणे तसेच कलमापठण करण्यास भाग पाडणे अशा प्रकारचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
इतकेच नव्हे, तर तक्रारदार हा शाकाहारी असूनही त्याला धमकी देत बळजबरीने नॉनव्हेज खाण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या कुटुंबातील अडचणींचा फायदा घेत 'धर्म बदलल्यास सर्व समस्या सुटतील' असा दबाव टाकण्यात येत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.