MLC Election pudhari photo
नाशिक

Nashik MLC Election | विधान परिषद निवडणुकीसाठी विक्रमी मतदान

Nashik MLC Election | 619 पैकी 618 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; मालेगाव केंद्रावर एक मतदार अनुपस्थित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणूक-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 9 केंद्रांवर गुरुवारी (दि.१८) शांततेत मतदान झाले असून, झालेल्या मतदानात तब्बल ९९.८४ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर केवळ एक मतदार मतदानापासून दूर राहिला.

सोमवारी (दि.२२) सकाळी आठ पासून जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा 9 मतदान केंद्रावरील मतपेट्या या जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये दाखल झाल्या.

त्यावर सीसीटीव्हीची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, चांदवड, कळवण आणि बागलाण या आठ केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. तर मालेगाव केंद्रावर ८४ पैकी ८३ मतदारांनी मतदान केल्याने ९८.८१ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार ३०० पुरुष आणि ३१९ महिला असे एकूण ६१९ मतदार होते. त्यापैकी २९९ पुरुष आणि ३१९ महिलांनी मतदान केले. त्यामुळे महिला मतदारांची उपस्थिती शंभर टक्के राहिली, तर पुरुष मतदारांपैकी केवळ एक मतदार अनुपस्थित राहिला.

नाशिक केंद्रावर १४६, दिंडोरी ३७, इगतपुरी ४७, निफाड ११०, येवला ८८, मालेगाव ८३, चांदवड ४१, कळवण ३८ आणि बागलाण केंद्रांवर २८ मतदारांनी मतदान केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी होत असलेल्या या निवडणुकीत मतदानाबाबत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

महापौरांनी सांभाळल्या पर्स अन् मोबाइल

दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास भाजपचे नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी मतदान केले. मतदान केंद्रात पर्स व मोबाइलला बंदी होती. त्यामुळे त्या मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर सर्व भाजपच्या नगरसेविकांनी त्यांच्याकडे पर्स व मोबाइल सांभाळण्यास दिले. तब्बल दहा ते बारा पर्स व मोबाइलचा सांभाळ त्यांनी यावेळी केला.

पोलिसांची धावपळ

मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास मतदान नसल्याने शुकशुकाट होता. मात्र, दुपारी दोननंतर सहलीवर गेलेल्या नगरसेवकांचा ताफा दाखल होण्यास सुरुवात झाली. भगूर, देवळाली कॅम्प पाठोपाठ नाशिक महापालिकेतील नगरसेवकांची बस येथे दाखल झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच गर्दी झाली. यातच महायुतीचे नेते, पुढारी, कार्यकर्त्यांची देखील गर्दी झाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT