Nashik MLC Election 
नाशिक

Nashik MLC Election | महायुतीत फूट, मविआची नाचक्की!

Nashik MLC Election | माजी आ. नरेंद्र दराडे, गणेश गिते, गोकुळ गिते, प्रसाद हिरे, गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे मैदानात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नाशिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारच शोधता न आल्याने त्यांची अक्षरशः नाचक्की झाली. येथे ठाकरे सेनेला जागा मिळाली असली तरी, पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिला तर मित्रपक्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसलाही उमेदवार रिंगणात उतरविता आला नाही.

दुसऱ्या बाजूला सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीत जागावाटपावरून उभी फूट आणि बंडखोरी झाली. या गोंधळात महायुतीकडून माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. महाविकास आघाडीची नाशिकमध्ये कमालीची दैनावस्था झाली.

उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या तिन्ही पक्षांपैकी कोणालाही तगडा उमेदवार मैदानात उतरवता आला नाही. जागावाटपात ही जागा उबाठा गटाला गेली. उबाठाकडून माजी आ. वसंत गिते, अनिल कदम यांना अर्ज दाखल करण्याचे आदेश होते. परंतु, दोघांनीही उमेदवारीस नकार दर्शविला. या निवडणुकीत घोडेबाजारला ऊत आला आहे. त्यात आम्ही सहभागी होऊ इच्छित नसल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिली.

महायुतीत मित्रपक्षांचे आव्हान !

महायुतीमध्ये तिढा सुटल्याचा दावा केला जात असतानाच, नाशिकमध्ये मात्र उमेदवारीवरून फूट पडली. नाशिकची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली आणि पक्षाने माजी आ. नरेंद्र दराडे यांना पुन्हा मैदानात उतरवले. दराडे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला.

तर नाशिकच्या जागेसाठी हट्ट धरून बसलेल्या भाजपकडून माजी सभापती गणेश गिते यांनी अर्ज दाखल करत सेनेला उघड आव्हान दिले. गोकुळ गिते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे हेही रिंगणात आहेत. भुजबळ यांचे समर्थक, गोरख बोडके, विष्णुपंत म्हैसधुणे यांनीही महायुतीला झटका दिला.

महायुतीत 'ऑल इज नॉट वेल'

मविआच्या अनुपस्थितीत ही निवडणूक महायुती विरुद्ध महायुती अशीच रंगण्याची चिन्हे आहेत. आता वरिष्ठांकडून या बंडखोरांचे बंड थंड केले जाते की, राजकीय महाभारतात महायुतीचे मित्रपक्ष एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करतात? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनुपस्थित असलेले आमदार सुहास कांदे यांनी आजच्या आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे उपस्थित राहता आले नसल्याची सांगत पक्षाच्या निर्णयांबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दराडे यांच्या विजयासाठी ताकदीने काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT