नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पारडे जड आहे. मात्र, मतपत्रिकेवर गिते आणि हिरे यांची नावे कायम असल्यामुळे महायुतीची धडधड कायम आहे.
महायुतीने सहलीवर नेलेल्या नगरसेवकांना बुधवारी (दि. १७) रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी बैठक घेत संवाद साधला.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मतदारांची जमवाजमव करीत, मतफुटीचा धोका टाळण्यासाठी सर्व मतदारांना भिवंडीजवळील अंजूर येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवले.
बुधवारी रात्री उशिरा मंत्री महाजन, मंत्री भुसे, मंत्री सामंत आणि समीर भुजबळ यांनी मतदारांची बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शनही केले. गुरुवारी (दि. १८) सकाळी लवकरच महायुतीच्या सर्व मतदारांना एकाच वाहन ताफ्यातून थेट मतदानस्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ताफा सकाळी नाशिकच्या दिशेने रवाना होईल. महायुतीकडे ६१९ मतदारांपैकी ४६६ मतांचे संख्याबळ असून, संख्यात्मकदृष्ट्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. मात्र, दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत सतर्कता बाळगण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचेही मतदार स्वतंत्रपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
असे आहे नियोजन
मतदानासाठी एक केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकार, १ शिपाई तसेच २ पोलिस असे सात जण एका केंद्रावर असणार आहेत. एकूण १३ पथके असून, त्यात चार राखीव नऊ नियमित एकूण ६५ कर्मचारी निवडणुकीसाठी असतील. सर्व मतदान पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ट्रेझरीमध्ये ठेवण्यात येतील. ९ मतदान केंद्रांचे वेबकास्ट होईल. जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
सीसीटीव्ही नजर
जिल्ह्यात दोन महानगरपालिका, एक कॅन्टॉन्मेंट बोर्ड, ११ नगर परिषदा, ६ नगरपंचायती यांचे असे एकूण ६१९ सदस्य मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. तसेच या सर्व केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल.
मतदानासाठी प्रशासन सज्ज
गुरुवारी (दि.१८) विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी अधिकारी व कर्मचारी मतपेट्या, आणि निवडणूक साहित्यासह पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर बुधवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक शंभरकर यांनी मतदान पेट्या व मतदान साहित्याची पहाणी केली. तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासंबंधी निर्देश दिले