Nashik Election 2026  pudari photo
नाशिक

Nashik Election 2026 | सिंहस्थ, पावसाळापूर्व कामांना आचारसंहितेचा बसला फटका

Nashik Election 2026 | सवलतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे तसेच महापालिकेच्या पावसाळापूर्व अत्यावश्यक कामांना ब्रेक लागला आहे.

या कामांना आचारसंहितेतून सूट मिळावी, अशा मागणीचा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. भारत निवडणूक आयोगाने १८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे.

राज्यातील १७ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. त्यानुसार संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, उल्लंघन टाळण्याचे आवाहन राजकीय पक्ष व उमेदवारांना करण्यात आले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत दरवर्षी केली जाणारी पावसाळापूर्व नालेसफाई, चेंबर स्वच्छता आणि पावसाळी गटारांची कामे रखडली आहेत. ही कामे प्रभागनिहाय ठेकेदारांच्या माध्यमातून केली जातात. यंदा उशीर झाला असतानाच आचारसंहिता लागू झाल्याने अडचण निर्माण झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी आवश्यक असलेली काही कामेही थांबली असून, ही कामे अत्यावश्यक असल्याने त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. आता या प्रस्तावावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत सिंहस्थासह पावसाळापूर्व कामे रखडण्याची शक्यता आहे. आचारसंहिता काळात या कामांना विशेष बाब म्हणून परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे विनंती प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
हिमगौरी आहेर-आडके, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT