जुने नाशिक : वार्ताहर
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळीविरोधात कारवाईचा धडका लावत, भेसळखोरांना धडकी भरविली आहे. रोज या विभागाकडून राज्यात मोठमोठ्या कारवाया केल्या जात असल्याने, हा विभाग सध्या चर्चेत आहे. आयुक्त मुंढे यांच्या कारवाया चर्चेत असतानाच, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळही अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी वाढदिवसाच्या दिवशीच भल्या पहाटे जुन्या नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकातील दूधबाजारात अचानक धाड टाकत धडक कारवाई केली. यावेळी काही - संयशयास्पद भेसळयुक्त दुधाचे नमुने - देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले.
पहाटेच्या सुमारास मंत्री झिरवाळ - अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह - दूधबाजारात धडकल्याने, विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या भेटीदरम्यान मंत्री झिरवाळ यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दूध, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची प्रत्यक्ष तपासणी केली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने विविध विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून नमुने घेत त्यांची जागेवरच प्राथमिक तपासणी केली. तसेच अन्नसुरक्षा व गुणवत्ता मानकांचे पालन होत आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. यावेळी मंत्री झिरवाळ म्हणाले, प्राथमिक तपासणीत कोणत्याही नमुन्यात भेसळ किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसून, अशा अचानक तपासण्या यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुधातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता शासनाने अन्नसुरक्षेबाबत अधिक कठोर भूमिका घेतली आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही मंत्री झिरवाळ यांनी यावेळी दिला. मंत्र्यांच्या या अचानक पाहणीमुळे दूधबाजार परिसरातील व्यापारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
दरम्यान, मुंबई आणि परिसरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, एफडीएने सर्व उत्पादक आणि व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक ही स्वच्छ जागी आणि योग्य तापमान नियंत्रित ठेवूनच करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त मुंढे यांनी यापूर्वीच दिला आहे.
अजित पवार यांचा आदर्श
मंत्री झिरवाळ यांनी वाढदिवसाच्या दिवशी ही कारवाई केली. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार ज्या प्रामाणे सकाळी उठून काम करत होते, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नरहरी झिरवाळ यांनी सकाळपासून कामाला सुरुवात केली असल्याची चर्चा यावेळी रंगली होती.