Nashik MIDC  file photo
नाशिक

Nashik MIDC Corruption| एमआयडीसीच्या सहा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

Nashik MIDC Corruption| त्रिपक्षीय करारासाठी दलालांना २५ हजार रुपये द्यावे लागत असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करत थेट मुख्यालयात बदली केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्रिपक्षीय करारासाठी दलालांना २५ हजार रुपये द्यावे लागत असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करत थेट मुख्यालयात बदली केली आहे.

बदली रद्द करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२३) मुख्यालयात धाव घेतली होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नसल्याचे वृत्त आहे. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये व्यवसाय सुलभतेबाबत बैठक घेण्यात आली.

त्यात एमआयडीसीच्या कारभाराबद्दल उद्योजकांनी तक्रारी केल्या होत्या. औद्योगिक भूखंडासंदर्भातील त्रिपक्षीय करारासाठी दलालांना २५ हजार रुपये द्यावे लागत असल्याचा दावा एका उद्योजकाने केला होता. त्याबद्दल माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यांची दखल महामंडळाच्या मुख्यालयातून घेण्यात आली.

सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना तातडीने नाशिकला पाठवण्यात आले होते. त्यांनी कामकाज, प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रादेशिक कार्यालयातील ६ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली.

कुंभार यांनी संबंधितांना बदलीचे तोंडी आदेश दिले होते. त्यापूर्वीच बदली रद्द करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी मुंबई मुख्यालयात धाव घेतली. मात्र, त्याठिकाणी या कर्मचाऱ्यांची बदली तर रद्द झाली नाहीच, शिवाय त्यांच्या हातात बदलीचे लेखी आदेश सोपवण्यात आल्याचे समजते.

उद्योजकांचा घुमजाव

दरम्यान, महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक कार्यालयात झाडाझडती घेतली. कुंभार २ दिवस नाशिकमध्ये होते. त्यांनी उद्योजकांचीही भेट घेतली.

त्यानंतर उद्योजकांनी बोलण्याच्या ओघात काही वर्षांपूर्वीचे दाखले दिल्याने गैरसमज झाल्याची सारवासारव केली होती. त्यामुळे कुंभार व उद्योजकांत नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत अशी कोणती चर्चा झाली, की त्यानंतर उद्योजकांना घुमजाव करावे लागले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT