नाशिक : नाशिकमध्ये प्रस्तावित टायरबेस्ड मेट्रो निओऐवजी नियमित मेट्रोचा मार्ग अखेर खुला झाला असून, बुधवारी (दि.१०) राज्याच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे. नियमित मेट्रोसाठी निओ मेट्रोचेच मार्ग कायम ठेवले जाणार आहेत. यासंदर्भात महामेट्रोचे पथक महिनाभरात नाशिकमध्ये येऊन पाहणी करणार आहेत. मेट्रोचे काम सिंहस्थापूर्वी सुरू करायचे की सिंहस्थानंतर यासंदर्भातील निर्णय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाशिकच्या झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील काही प्रमुख मार्गावर प्रतितास २० हजारांहून अधिक प्रवासी उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आल्याने मेट्रो निओऐवजी अधिक क्षमतेच्या नियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रोचा विचार पुढे आला आहे.
सिंहस्थापूर्वी की नंतर, निर्णय प्रलंबित
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सिंहस्थापूर्वी सुरू करायची की सिंहस्थानंतर, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, शहराच्या दीर्घकालीन वाहतूक गरजा लक्षात घेता प्रकल्पाला प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.
मेट्रो निओपासून नियमित मेट्रोकडे प्रवास
नाशिकसाठी सन २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानंतर सिटीलिंक बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस्ड मेट्रो निओची घोषणा केली होती. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत त्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, वाढती प्रवासीसंख्या आणि बदलत्या वाहतूक गरजांमुळे आता मेट्रो निओचा पर्याय मागे पडत असून, नियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रोच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत.
मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट हबला मिळणार चालना
बैठकीत नाशिकरोड येथे प्रस्तावित मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट हब प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. रेल्वे, सिटीलिंक बससेवा आणि मेट्रो यांना एकाच संकुलात एकत्र आणण्याची संकल्पना यामध्ये आहे. प्राथमिक आराखड्यानुसार पहिल्या स्तरावर रेल्वे, दुसऱ्या स्तरावर सिटीलिक बससेवा आणि तिसऱ्या स्तरावर मेट्रो स्थानक प्रस्तावित आहे. याशिवाय इमारतीतील इतर मजल्यांवर शॉपिंग सेंटर, खाद्यपदार्थ केंद्रे, हॉटेल्स, जिम तसेच व्यावसायिक कार्यालयांची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे