मेट्रो प्रकल्प / Metro project pudhari file photo
नाशिक

Nashik Regular Metro Project | नाशिक मेट्रो प्रकल्पाला वेग; मंगळवारी निर्णायक बैठक

Nashik Regular Metro Project | मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात निर्णायक बैठक; वाहतूक आराखड्याच्या अंतिम मसुद्यावर होणार चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकसाठी नियमित मेट्रो प्रकल्प टप्प्यात आला आहे. नियमित मेट्रोचा समावेश असलेली आणि नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणारी बैठक येत्या मंगळवारी (दि. २१) विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो)ने तयार केलेल्या नाशिक महानगर प्रदेशाच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याच्या अंतिम मसुद्यावर या बैठकीत चर्चा होणार असून, लोकप्रतिनिधी व संबंधित हितधारकांकडून अभिप्राय नोंदविण्यात येणार आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्वचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टायर-बेस 'निओ मेट्रो'ऐवजी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर नियमित मेट्रो प्रकल्पाचा विचार करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीची दखल घेतल्यानंतर या विषयावरील हालचालींना गती मिळाल्याचे मानले जात आहे. महामेट्रोकडून तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याचे सादरीकरण बैठकीत करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून सूचना, अभिप्राय आणि निरीक्षणे नोंदवून अंतिम मसुदा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

या बैठकीस महापौर हिमंगौरी आहेर-आडके, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे, सत्यजित तांबे, पंकज भुजबळ, गोकुळ गिते, तसेच उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

नाशिक महानगर प्रदेशाची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली असून, शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे भविष्यातील प्रवासी क्षमता लक्षात घेता 'निओ मेट्रो' पुरेशी ठरणार की शहरासाठी नियमित मेट्रो अधिक उपयुक्त राहील, यावर बैठकीत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.

या बैठकीकडे नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात असून, राज्य शासन मेट्रो प्रकल्पाबाबत कोणता निर्णय घेते याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

नाशिकची वाढती लोकसंख्या तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आता मोठ्या शहरांप्रमाणे मेट्रोसारखी वाहतूक व्यवस्था देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. त्या अनुषंगाने महत्त्वाचा मसुदा निश्चित होणार आहे.
अॅड. राहुल ढिकले, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT