Fire Brigade Pudhari
नाशिक

Nashik Fire Brigade Fake Officer Scam | अग्निशमन दलाच्या नावाने व्यापाऱ्यांच्या फसवणुकीचा प्रयत्न

Nashik Fire Brigade Fake Officer Scam | व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या नावाने फायर सेफ्टी तपासणी तसेच ना हरकत व परवाना नूतनीकरणाचे कारण सांगून काही अज्ञात व्यक्तींकडून शहरातील व्यापाऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार पंचवटीतील प्रभाग १ चे नगरसेवक प्रवीण जाधव यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

व्यापाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. नाशिक शहरातील व्यापाऱ्यांना लक्ष्य करून काही अज्ञात व्यक्ती महानगरपालिकेच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. काही व्यक्ती दुकानदारांकडे जाऊन नाशिक अधिकारी असल्याचे भासवत खोटे फॉर्म भरून घेत आहेत.

फायर सेफ्टी तपासणी, अग्निशामक दलाची हरकत, परवाना नूतनीकरण आदी कारणे सांगून संबंधितांकडून माहिती गोळा केली जात आहे. याचबरोबर दुकानदारांना दोन हजार पाचशे ते साडेचार हजार रुपये किमतीचे फायर एक्स्टिंग्विशर खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असून, अन्यथा दुकानाचा परवाना रद्द होईल किंवा कारवाईची भीती दाखवली जात असल्याचे समोर आले आहे.

नगरसेवक जाधव यांनी स्पष्ट केले की, नाशिक महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा कर्मचाऱ्यास खासगी कंपनीकडून साहित्य खरेदी करण्याची सक्त्ती करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणताही फॉर्म भरताना संबंधित व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र आणि महापालिकेचे प्राधिकरण पत्र तपासावे. तसेच कोणालाही रोख अथवा ऑनलाइन स्वरूपात पैसे देण्यापूर्वी खात्री करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

याशिवाय अशा प्रकारे दबाव टाकला जात असल्यास तातडीने नाशिक महानगरपालिका, अग्निशमन विभाग किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तींचे नाव, मोबाइल क्रमांक, फोटो अथवा व्हिडिओ उपलब्ध असल्यास ते जतन करून ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी सतर्क राहून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रवीण जाधव यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT