Nashik Ganesh Utsav  
नाशिक

Nashik Market | नाशिकची बाजारपेठ सजली! गणेशोत्सवामुळे हजारो कोटींच्या उलाढालीची व्यापाऱ्यांना अपेक्षा

Nashik Market | खरेदीचा श्रीगणेशा : बाजारपेठ सजली, व्यापारीवर्गाला तेजीची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच नाशिकच्या बाजारपेठेवरील मरगळ दूर होण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त घरगुती सजावट, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपासून वाहन, सोने-चांदी आणि घरखरेदीपर्यंत विविध क्षेत्रांत ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव बाजारपेठेसाठी 'बूस्टर डोस' ठरण्याची अपेक्षा व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव हा नाशिकच्या बाजारपेठेसाठी वर्षातील पहिल्या मोठ्या खरेदीच्या पर्वांपैकी एक मानला जातो. गणरायाच्या स्वागतासाठी मूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य यांची खरेदी सुरू होतेच; त्यासोबतच नवीन वस्तू खरेदीचा मुहूर्त म्हणूनही या कालावधीकडे पाहिले जाते.

परिणामी, बाजारपेठेतील विविध वस्तूंना ग्राहकांची मागणी वाढते. गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात नाशिकच्या बाजारपेठेत घर, वाहने, फुले, मिठाई, इलेक्ट्रॉनिक्स आणि आदरातिथ्य व्यवसायासह विविध क्षेत्रांत मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले होते.

या काळात सुमारे २०० कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज व्यक्त झाला होता. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावरही नाशिकच्या विविध बाजारपेठांत ७०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता.

त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक अर्थचक्राला गती देणारा महत्त्वाचा सण ठरत आहे. गणरायाच्या आगमनासोबतच ग्राहकांची वाढणारी पावले, व्यापाऱ्यांची तयारी आणि विविध क्षेत्रांतील खरेदीच्या अपेक्षा यामुळे यंदाचा गणेशोत्सव नाशिकच्या बाजारपेठेसाठी चैतन्याची नवी सुरुवात ठरण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, कापड बाजारही सज्ज

गणेशोत्सवासाठी घराची सजावट करण्याबरोबरच नवीन दूरचित्रवाणी, वातानुकूलन यंत्रणा, मोबाइल, घरगुती उपकरणे, फर्निचर आदींच्या खरेदीचा कल वाढला आहे. तसेच गणेशोत्सवातील कार्यक्रम, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि सणासुदीच्या वातावरणामुळे कपडे, साड्या, तयार कपडे यांनाही मागणी वाढते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि वस्त्रबाजारातही ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

वाहन बाजारात 'बाप्पा'ची सवारी

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन वाहन घेण्याकडे नाशिककरांचा कल वाढला आहे. दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांची बुकिंग आणि वितरणालाही या काळात वेग येण्याची शक्यता आहे. आकर्षक योजना, कर्जाच्या सुविधा आणि विविध कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलती यामुळे वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सराफ बाजारात झळाळी

सोने - चांदीच्या दरात चढउतार असले तरी सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदीची परंपरा कायम आहे. गणेशोत्सवानिमित्त सोन्याचे दागिने, नाणी तसेच चांदीच्या वस्तूंना मागणी वाढण्याची शक्यता आहे. दर वाढले असले तरी सणाचा मुहूर्त आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोन यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची पावले वळण्याची अपेक्षा आहे.

घरखरेदीलाही मुहूर्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळते. नवीन घर, सदनिका किंवा भूखंड खरेदीसाठी ग्राहक मुहूर्त शोधतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडूनही गणेशोत्सवाच्या कालावधीत विशेष योजना व सवलती जाहीर केल्या जात आहेत. गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात नाशिकमध्ये घरखरेदीला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदाही या क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT