MLA Rahul Aher Minister Jayakumar Rawal
देवळा : नाफेड आणि एनसीसीएफमार्फत करण्यात येणारी कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (दि. २९) निवेदन सादर केले.
कांद्याच्या घसरत्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातून दोन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार ही खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, बाजार समिती परिसरात कांदा खरेदी सुरू करण्यासाठी काही प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याचे आमदार आहेर यांनी निदर्शनास आणून दिले. ज्या संस्थेमार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे, त्या संस्थेला बाजार समितीकडून परवाना घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना तात्पुरते परवाने देण्यात यावेत, तसेच बाजार समितीमार्फत आकारली जाणारी शुल्क फी माफ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या अडचणी दूर झाल्यास शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने बाजार समितीच्या आवारात कांदा विक्री करता येईल आणि त्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणारी कांदा खरेदी सुरळीतपणे बाजार समित्यांमध्ये व्हावी, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.