Nashik Market Committee file photo
नाशिक

Nashik Market Committee | नाशिक बाजार समितीवर 37 वर्षांनंतर अशासकीय प्रशासक मंडळ; अध्यक्षपदी गणेश गिते यांची निवड!

Nashik Market Committee | बाजार समितीवर 37 वर्षांनंतर अशासकीय प्रशासक मंडळ

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

नाशिक बाजार समिती विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असताना आणि लवकरच निवडणुका जाहीर होतील या आशेने माजी सभापतींनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या पणन संचालनालयाने नाशिक बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती जाहीर केली. यात अध्यक्षपदी गणेश गिते यांची निवड केली.

या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात गिते बंधूंचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक बाजार समितीचे विभाजन दि. २१ जुलै २०२६ रोजी होऊन नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या आहेत. या विभाजनानंतर आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे हे मुख्य प्रशासक म्हणून कामकाज पाहात होते.

मात्र, पणन संचालनालयाने 'महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३' मधील कलम १५(अ) नुसार या सरकारी प्रशासकाऐवजी अशासकीय प्रशासक मंडळाला मान्यता दिली असून, अध्यक्ष गणेश गिते, सदस्य माजी आमदार बाळासाहेब सानप, बापू पिंगळे, सचिन ढिकले यांच्या नियुक्तीबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

हे नवनियुक्त अशासकीय प्रशासक मंडळ पुढील ६ महिने किंवा नवीन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) कामकाज पाहणार आहे. या आदेशानुसार तत्काळ आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
ही केवळ प्रशासकीय नियुक्ती नसून याला मोठे राजकीय कंगोरे असल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणात काय उलथापालथ होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१९८९-९० नंतर प्रशासक मंडळ:

नाशिक बाजार समितीच्या इतिहासात तब्बल ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी १९८९-९० च्या सुमारास प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते, त्याचे अध्यक्ष म्हणून पोपतराव पिंगळे यांनी सुमारे दीड वर्ष काम पाहिले होते.

पूर्वमंजुरी बंधनकारक:

प्रशासक मंडळाच्या कालावधीत बाजार समितीचे दैनंदिन कामकाज नियमित सुरू राहणार असले, तरी विकासकामे, मोठे आर्थिक व्यवहार आणि धोरणात्मक निर्णयांसाठी पणन विभाग, कृषी पणन मंडळ व शासनाच्या नियमांनुसार पूर्वमंजुरी घेणे बंधनकारक असणार आहे.

सहा महिन्यांत निवडणूक आवश्यक:

बाजार समितीत प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली असली, तरी नवीन लोकनियुक्त समिती अस्तित्वात येईपर्यंत ही प्रशासकीय व्यवस्था लागू राहते. विद्यमान कायद्यानुसार प्रशासक मंडळाने पदभार स्वीकारल्यापासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे असे कायदेशीर जाणकारांचे मत आहे.

अशासकीय प्रशासक मंडळातील नवनियुक्त पदाधिकारी:

  • गणेश बबन गिते - अध्यक्ष

  • बाळासाहेब महादू सानप - सदस्य

  • सचिन भास्कर ढिकले - सदस्य

  • बापू विश्वनाथ पिंगळे - सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT