मालेगाव (नाशिक) : उन्हाळ्यात 47 अंश तापमानाचा उच्चांक गाठणारा परिसर अशी नाशिक जिल्ह्यात मालेगावची ओळख आहे. पण, यावर्षी निसर्गाने आपला नूर असा काही बदलला आहे की, नोव्हेंबर व डिसेंबर मध्येच ‘हुडहुडी’ भरली आहे.
थंडीचा प्रभाव दरवर्षी जानेवारीत किंवा पौष पोर्णिमेनंतर चंदनपुरी यात्रोत्सवात जाणवतो. यावर्षी नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरला मध्यावरच किमान तापमानाने 7 अंश सेल्सियसपर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे. गेल्या काही वर्षांंमध्ये येथील थंडीतही वाढ झाली आहे. दिवसादेखील कधी नव्हे एवढी थंडी गेल्या आठवडाभरापासून जाणवत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली उतरतच आहे. दि. 19 डिसेंबरला दिवसाचे तापमान 8 अंशांवर आलेले असताना, दि. 20 डिसेंबरला पारा थेट 7.8 अंशांवर घसरला. या आकड्यांवरून स्पष्ट होते की, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जानेवारीत ज्या थंडीची अपेक्षा करतात, ती थंडी आताच जाणवत आहे. दिवसाही नागरिक स्वेटर, शाली आणि कानटोप्या वापरत असल्याचे चित्र शहर, तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.
शेतीसाठी अनुकूल, प्रतिकूल परिणाम या तीव्र थंडीबरोबरच सकाळच्या वेळेस पडणार्या धुक्याचे प्रमाण वाढल्यास कृषी क्षेत्रासाठी धोक्याची शक्यता निर्माण होते. कृषी तज्ज्ञांच्या मते जर धुक्याचे वातावरण असेच राहिले आणि तापमान इतके खाली राहिले, तर याचा थेट परिणाम या महत्त्वाच्या पिकावर होऊ शकतो. धुक्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांनी आतापासूनच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. 10 अंश सेल्सियसपेक्षा कमी सलग 6 ते 7 दिवस तापमान राहिल्यास थंडीच्या काळात पेरणी केलेल्या मका, गहू पिकाची उगवण कमी होते.
घसरते तापमान पिकांच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते. ज्यामुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादनात घट होते. तापमान 5 अंशांपेक्षा कमी झाल्यास पिकांची वाढ खुंटते. पेशींचे विभाजन थांबते, प्रकाश संश्लेषण मंदावून पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी झाल्यासे पिके पिवळी पडणे, फळे व फुले कमी लागणे असे परिणाम होतात. थंड तापमानामुळे पेशींमधील पाणी गोठू शकते. किंवा पिकांना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. बागलाण तालुक्यातील द्राक्षबागांना त्याचा काही प्रमाणात फटका बसत असला, तरी शेतकर्यांनी बागा वाचविण्यासाठी प्लास्टिक अच्छादन व अन्य उपाययोजना केल्या आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, अशा वातावरणात सर्दी खोकला ताप यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तसेच असे वातावरणांमध्ये मातीमध्ये काम करणार्या मजूरांची त्वचा फाटू शकते. त्यामुळे त्यांनी हातापायांना तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. त्यांच्या त्वचेचे संरक्षण होईल. लहान मुलांना गरम जेवण द्यावे. त्यांची व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. या काळात रात्री थंडी असताना गरम सूप पिणे दिलासादायक असते.