मालेगाव (नाशिक) : शहरात सोमवारी (दि. 22) पावसाने वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. रात्री शहर व तालुक्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले. सहा मंडलांमध्ये 50 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कळवाडी मंडळात सवाधिक 108 मिमी पावसाची नोंद झाली. 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेल्या मंडळांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
जोरदार पावसामुळे चार गोवंश, एक शेळी, एक मेंढी अशा पशुधनाचे नुकसान झाले. निमगाव व येसगाव बु. येथे वीज पडून गाय व बैल जागीच ठार झाले. सुमारे 15 घरांच्या भिंती कोसळल्या. संततधारेमुळे डाबली येथील पाच घरे व त्यांच्या भिंंती कोसळल्या. तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली असून, आजवर एकूण 524 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभ रात सर्व मंडळांमध्ये मिळून सरासरी 153.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. करंजगव्हाण, कळवाडी, कौळाणे, डोंगराळे विभागात जोरदार पाऊस झाला. गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. काढणीवर आलेल्या खरीप पिकासह कांदा व उळ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी काही भागांचा दौरा करून नुकसानीची माहिती घेतली. महसूल विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुक्यातील कळवाडी मंडळात दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. कळवाडी विभागात सोमवारी एकाच दिवसात 108 मि.मी. पावसाची नोंद झाली. येथे आजवर 889.5 मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण 206.9 टक्के पाऊस झाला आहे. याउलट सौंदाणे मंडळावर पावसाची अवकृपा आहे. येथे आजवर अवघ्या 184.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 50 टक्के देखील पाऊस न झाल्याने या मंडळातील नदीकाठची गावे वगळता अन्य गावातील खरीप पिकांची परिस्थिती बिकट आहे. नऊ मंडळांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पशुधनाचे नुकसान
निमगाव येथील रवींद्र अहिरे यांची गाय, तर येसगाव बु. येथील रवींद्र सोनवणे यांचा बैल वीज पडून ठार झाला. दसाने येथील मधुकर देवरे यांच्या बैलाचा अकस्मात मृत्यू झाला. अतिवृष्टीने सुनीता चौधरी (जळगाव (नि.) यांची मेंढी मृत्युमुखी पडली. वडगाव येथील सुनंदा हिरे यांच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तीन बैल, एक गाय, शेळी, मेंढी अशा पशुधनाचे नुकसान झाले.
या कुटुंबाच्या घरांची झाली पडझड
दयाराम शेवाळे (टेहरे)
सोन्याबाई अहिरे (पाच डिव्हिजन)
बंडू करविले (चिंचगव्हाण)
चंद्रकांत भोसले, अशोक ढगे, रामबाई देसले, किशोर वाघ, नेताजी भोसले (सर्व रा. डाबली)