Accident News Pudhari
नाशिक

Malegaon Accident News | मालेगावजवळ एसटीचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

Malegaon Accident News | नाशिक-मालेगाव मार्गावर धुळेच्या दिशेने जाणाऱ्या शहादा आगाराच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बुधवारी (दि. ६) दुपारी मालेगावजवळ भीषण अपघात घडला.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-मालेगाव मार्गावर धुळेच्या दिशेने जाणाऱ्या शहादा आगाराच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बुधवारी (दि. ६) दुपारी मालेगावजवळ भीषण अपघात घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातात तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शहादा आगाराची एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३५१५) नाशिकह्न मालेगाव, धुळे मार्गे शहादाकडे जात होती. चाळीसगाव फाटा ओलांडल्यानंतर बस वेगात असताना चालकाच्या लक्षात आले की, बसचे ब्रेक निकामी झाले आहेत.

त्याचवेळी समोर दोन दुचाकीस्वार दिसल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला वळवली. मात्र, वेग अधिक असल्याने वस रस्त्यालगतच्या वीजखांबावरील डीपीला घासत गेली.

या धडकेत चालकाच्या बाजूचा बसचा अर्धा पत्रा फाटून निघाला. तरीही बस थांबली नाही आणि सुमारे ७०० मीटरपर्यंत सुसाट धावत राहिली. या दरम्यान भीतीपोटी काही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने ते जखमी झाले.

बसमध्ये एकच आरडाओरड आणि गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तत्परता दाखवत बसच्या चाकांखाली मोठे दगड टाकून बस थांबविण्यास मदत केली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली आणि रुग्णवाहिकांच्या सहाय्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, पीएसआय तुषार भदाणे, हवालदार सागर निकम, शिपाई योगेश गुंजाळ, सिकंदर कोळी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT