नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी एकमत न होऊ शकल्याने नाशिक गटातून सात उमेदवार रिंगणात राहिल्याने ते एकमेकांसमोर ठाकले गेले. यात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, माजी आ. इंद्रजित गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांचा समावेश आहे. खोसकर यांनी निवडणूक न लढवण्याचे पत्र दिल्यानंतर आता झिरवाळ व गावित यांची निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे बघावयास मिळत आहे. झिरवाळ व गावित यांचे चिन्ह वेगवेगळे असले तरी दोघे एकत्रित प्रचारात दिसत आहेत. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र पोस्टर दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, सहायक निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी होत असलेल्या १५ गटांसाठी मतदान केंद्र जाहीर केली आहे. नाशिक गटासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शुक्रवारी (दि. १४) सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होईल. रविवारी (दि.१६) सकाळी ९ पासून सीबीएस येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या १७ जागांसाठी २०१० नंतर निवडणूक होत आहे.
त्यामुळे या निवडणुकीसाठी यंदा इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली होती. १७ जागांसाठी ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या अंतिम दिवशी निवडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, हा प्रयत्न निष्फळ ठरला. यात केवळ दोन जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना ३ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप झाले. वामन खोसकर यांनी निवडणुकीत माघार घेण्यास उशीर झाल्याने अर्ज माघारी होऊ शकला नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. माजी आमदार गावित व मंत्री झिरवाळ यांची आघाडी झाल्याचे दिसून येत आहे. दोघांचे पुत्र रिंगणात असल्याने ते एकत्रित प्रचारात आहे.
या ठिकाणी होणार मतदान
नाशिक - जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, नंदुरबार - जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार, धुळे - जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे, जळगाव - सहायक निबंधक सहकारी संस्था रावेर (जि. जळगाव).