नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. आकाश अंबादास कांगुणे (२४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, नाशिकरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला एकलहरे परिसरातून ताब्यात घेतले.
फिर्यादी पूनम सौदे यांचा मुलगा यश याच्याशी परिसरात राहणारी एक महिला प्रेमसंबंध ठेवण्यास इच्छुक होती. यासाठी ती त्याला वारंवार फोन करून संपर्क साधत होती. मात्र, यश याने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून ११ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश कांगुणे, आकाश कांगुणे आणि इतरांसह संबंधित महिलेने फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला.
यावेळी आकाश कांगुणे याने यशला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी १२ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्ह्यातील फरार संशयित आकाश कांगुणे हा एकलहरे परिसरात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी ही कारवाई केली.