नाशिक

Nashik Lok Sabha | वस्तुस्थितीशी फारकत घेतल्यानेच उलटफेर! 

अंजली राऊत

[author title="नाशिक । मिलिंद सजगुरे" image="http://"][/author]
सत्तेची फळं चाखायला एकत्र येताना मतभेदाच्या भिंती गाडण्याचे दातृत्व दाखवण्यात राजकारणी कसूर सोडत नाहीत. तथापि, हा समझोता करताना जनभावना पायदळी तुडवण्याचा प्रमाद करण्याची किंमत चुकवावीच लागते. लोकसभा निवडणुकीत अशाच प्रमादाच्या शिडीवर चढून पुन्हा सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या महायुती नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम मतदारराजाने केले. महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस आणि उत्तर महाराष्ट्रात सर्व सहा जागांचा ढोल वाजवणाऱ्या महायुतीला वस्तुस्थितीचा अंदाज न आल्यानेच स्वप्नभंगाचा सामना करावा लागल्याचा निष्कर्ष काढता येईल.

शरीराने सोबत पण मनात मात्र दुसरेच

आधी शिवसेना, पाठोपाठ राष्ट्रवादी काॅंग्रेसची शकले पाडणाऱ्या भाजपने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचाच नाही, अशा विचाराने मार्गक्रमण सुरू केले. दोन्ही पक्षांतील फुटिरांना निवडणुकीत मानाचे पान देण्याचा दिलेला शब्द अक्षरश: विजयाची मोहोर असल्यागत गारुड केले गेले. सत्तेच्या सारीपाटावरील हा खेळ जनभावनांशी मेळ घालणारा आहे की नाही, याचे भान कोणालाही राहिले नाही आणि त्याच उन्मादाने आजच्या निकालात सत्ताधाऱ्यांचा घात केला. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना जनानुकूलता नाही हे ढीगभर सर्वेक्षणांनी अधोरेखित करूनही त्यांना मैदानात उतरवण्यात आले. छगन भुजबळ यांना दस्तुरखुद्द अमित शाह यांनी 'ग्रीन सिग्नल' देऊनही भाजपच्या राज्य नेतृत्वाने त्यांच्या नावाला 'रेड सिग्नल' दाखवला. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि भुजबळ समर्थकांनी नाशिकसह दिंडोरीत आपले उपद्रवमूल्य सिध्द केले. गोडसे हे भाजपचीही पसंती नसल्याने भाजपेयी केवळ शरीराने त्यांच्यासोबत होते, मन मात्र वेगळाच विचार करीत असल्याचे मतांची आकडेवारी सांगते. जमिनीवरचा माणूस म्हणून सर्वज्ञात असलेले राजाभाऊ वाजे यांचा पक्ष भले विकलांग असेल, पण त्यांच्यातील साधेपण त्यांना विजयासमीप घेऊन गेले.

काळ्या दगडावरील धवल रेघ

पहिल्याच खेपेस भाजपकडून विजय अन‌् थेट केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालेल्या डॉ. भारती पवार यांची यंदाची उमेदवारी 'डेंजर झोन' दाखवत होती. दिंडोरी मतदारसंघातील तुटलेला पीपल कनेक्ट, शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली कांदा निर्यातबंदी, शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, लासलगाव-मनमाड-नांदगाव स्थानकांवर रद्द झालेले रेल्वेथांबे या मुद्द्यांवरून डॉ. पवार यांना यंदाचा पेपर अवघड जाणार, ही काळ्या दगडावरील धवल रेघ होती. विरोधकांनी याच मुद्द्यांचे भांडवल करून शिक्षकी पेशातील भास्कर भगरेंना प्रोजेक्ट करण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. लोकसभा क्षेत्रातील सहाही आमदार महायुतीचे असून, त्यांची यंत्रणा डॉ. पवारांचा पराजय रोखू शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कांदा मुद्द्यावरून असलेला असंतोष शमवू शकली नाही. अखेर लागायचा तोच निकाल लागला आणि दिंडोरी भाजपच्या हातून गेले.

महायुतीचा भ्रमाचा भोपळा फुटला

चार मराठा उमेदवार रिंगणात असल्याने मराठा मतांचे विभाजन होईल, आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले शांतिगिरी महाराज मतांचे मोठे पॉकेट घेतील, राज्यातील 'माधव' पॅटर्नमुळे दोन-सव्वादोन लाख मतांचा धनी असलेला वंजारी समाज एकगठ्ठा महायुतीच्या मागे उभा राहील, वाजे यांची ग्राम्य पार्श्वभूमी शहरी मतदारांना पसंत पडणार नाही, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नाममात्र अस्तित्व असल्याने त्यांची वज्रमूठ कामी येणार नाही या मुद्द्यांचा किस काढत गोडसे काही हजार मतांनी तरी निवडून येतील हा महायुतीचा भ्रमाचा भोपळा फुटला. तिकडे दिंडोरीतही सहा आमदारांची भरभक्कम बाजू, चार लाखांच्या संख्येने असलेला आदिवासी कोकणा समाज, मविआ नेत्यांची छुपी मदत, मोदी लाट वगैरे फुकाच्या गप्पा ठरल्या आणि 'जायंट किलर' ठरलेल्या भास्कर भगरे यांनी सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या डॉ. भारती पवार यांना पराभवाची धूळ चाखायला लावली.

घरभेद्यांना ओळखण्यात सपशेल अपयशी

डॉ. शोभा बच्छावांचा निसटता विजयदेखील महायुतीच्या अतिआत्मविश्वासाचे फलित मानले जावे. बाहेरच्या उमेदवार म्हणून हिणवताना त्यांच्या पक्षाशी इमान बाळगलेल्या मतदारांसह निर्णायक ठरणाऱ्या मुस्लीम समाजाचा महायुतीला अंदाजच आला नाही. त्याची परिणती डॉ. सुभाष भामरे यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या पराभवात झाली. नंदुरबारमध्येही नवख्या उमेदवाराला गांभीर्याने न घेण्याची चूक महायुतीच्या नेत्यांनी केलीच, शिवाय घरभेद्यांना ओळखण्यात लाखांच्या मताधिक्याची बात करणारे सपशेल अपयशी ठरले. जळगाव आणि रावेरमधील महायुतीचा विजय निर्भेळ मानायला हरकत नाही. तथापि, सहापैकी चार ठिकाणी झालेला पराभव हा वस्तुस्थितीशी फारकत घेतल्यानेच महायुतीच्या वाटेला आल्याचा निष्कर्ष काढण्यास पुरेसा ठरावा.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT