नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. युतीत ही जागा शिवसेनेच्या (शिवसेना फुटीपूर्वी) वाट्याला होती. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली असून, शिवसेना फुटली आहे.
या फुटीनंतर शिंदे शिवसेनेने या जागेवर दावा कायम ठेवला आहे. परंतु, भाजपचे वर्चस्व वाढल्याने त्यांनीही या जागेसाठी हट्ट धरला आहे. त्यामुळे जागेसाठी दोघांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दुसरीकडे, दोघा पक्षांमधील इच्छुकांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अखेर जाहीर झाली असून, नाशिकसह राज्यातील १६ मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
नाशिक मतदारसंघाचे विद्यमान सदस्य नरेंद्र दराडे यांचा कार्यकाळ २१ जून २०२४ रोजी संपुष्टात आला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आवश्यक निकष पूर्ण न झाल्याने ही निवडणूक रखडली होती. आता संबंधित सर्व निकष पूर्ण झाल्याची माहिती राज्य निवडणूक यंत्रणेकडून आयोगाला देण्यात आल्यानंतर निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. शिंदे सेनाच जागा लढविणार महायुतीत ही जागा शिंदे शिवसेनेच्या वाट्याला असल्याचा दावा शिंदे सेनेने केला आहे.
ज्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या जागा शिंदे सेनेकडे राहतील. यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघ हा शिंदे शिवसेनेने लढविला, यात ते विजयीदेखील झाले. गत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नरेंद्र दराडे यांनी निवडणूक ही शिवसेनेकडून लढविली होती. आता ते शिंदे सेनेत आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे सेनेकडेच राहणार असल्याचे शिंदे सेनेकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेनेने ज्या जागा लढविल्या होत्या त्या निवडणुका लढविल्या जातील असे शिंदे सेनेच्या झालेल्या बैठकीतीही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगत, तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपचा जागेवर दावा या जागेवर भाजपने दावा ठोकला आहे. आठ वर्षांपूर्वी निवडणूक लढविली त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता राजकीय समीकरणे ही बदलेली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारात पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असल्याने ही जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे लक्ष
महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे फारसे प्राबल्य नाही. या आघाडीकडून गोकुळ पिंगळे, अॅड. शिवाजी सहाणे यांच्या नावाची चर्चा आहे.
हे आहेत इच्छुक
शिंदे शिवसेनेकडून या जागेसाठी माजी आ. नरेंद्र दराडे हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. याशिवाय अजय बोरस्तेही इच्छुक आहेत. दराडे यांचे पुत्र युवा नेते कुणाल दराडे यांचे नाव पुढे येऊ शकते. भाजपकडून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप, नीलेश बोरा, बापूराव पिंगळे यांच्या नावांची चर्चा पक्षांतर्गत आहे.