Nashik Leopard Attack Pudhari Photo
नाशिक

Nashik Leopard Attack|सिन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा बळी : दीड वर्षीय बालकाचा मृत्यू, ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक

सात दिवसांत तीन बालकांवर हल्ला, दोघांचा मृत्यू : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे बालकांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप

Namdev Gharal

सिन्नर : सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. खडांगळी गावाजवळील निमगाव-देवपूर शिवारातील लामकानी येथील शेतात झालेल्या या घटनेत दीड वर्षांचा गोलू युवराज शिंगाडे या बालकाला बिबट्याने उचलून नेले. काही अंतरावरील उसाच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात हळहळ, संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या शेतात मजुरीसाठी आलेले कोकणी कुटुंब शनिवारी (दि. 13) सायंकाळी चाळीत बसलेले असताना हा प्रकार घडला. बिबट्याने चाळीतूनच गोलूला उचलून नेले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध घेतला असता सुमारे २०० मीटरवर असलेल्या उसाच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळला. मृत बालक गोलू शिंगाडे हा मूळचा कुंबाळे (ता. पेठ) येथील असून आई-वडिलांसह येथे राहत होता.

या दुर्दैवी घटनेमुळे सिन्नर तालुक्यात संताप आणि हळहळ पसरली असून पालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांत या परिसरात बिबट्याची सतत वावर दिसून येत आहे. केवळ तीन-चार दिवसांपूर्वी याच शिवारात आणखी एका बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. मात्र त्या वेळी आजीच्या प्रसंगावधानामुळे मुलगा थोडक्यात बचावला. त्यानंतर आज घडलेली ही दुर्दैवी घटना नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे.

वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या घटना थांबवण्यात अपयश आल्याने ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

सात दिवसांत तीन बालकांवर हल्ला, दोघांचा मृत्यू
दरम्यान, गेल्या सात दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. याआधी पंचाळे शिवारात घराजवळ खेळत असलेल्या एका मुलाला बिबट्याने उचलून नेले होते. सलग दोन बालकांचे मृत्यू हा वनविभागाच्या निष्क्रियतेचा कळस असल्याची टीका ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांचा रोष उफाळला

ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. “आम्ही शेतात जायला घाबरतोय. लहान मुलं घराबाहेर काढूच शकत नाही. रात्रंदिवस भीतीमध्ये आहोत,” असे एका शेतकऱ्याने सांगितले. तर दुसऱ्या ग्रामस्थाने “प्रशासन आणि वनविभाग तातडीने ठोस कारवाई करणार नसेल, तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही,” असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT