

नाशिक (दातली, ता. सिन्नर) : येथील पांढरी मळा परिसरात (गट क्र. ४९८) शनिवारी (दि.21) रोजी सकाळी शेतकऱ्यासमोरच बिबट्याने वासरावर हल्ला करत त्याला शेतात ओढून नेले. या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या आदल्याच दिवशी, अवघ्या ५०० मीटर अंतरावर गोंदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता.
शेतकरी पांडुरंग गारे सकाळी साडेसहाच्या सुमारास गाईंचे दूध काढण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी शेजारी बांधलेल्या वासरावर बिबट्याने झडप घातली. गारे यांनी लाकडी दांड्याने बिबट्याचा पाठलाग केला असता, बिबट्याने त्यांच्यावरही झडप घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पळ काढल्याने ते बचावले. बिबट्याने वासराला ओढत गवतात नेले. घटनेची माहिती गारे यांनी वनविभागाला दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांच्या तसेच पशुधनाच्या सुरक्षेसाठी बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी दातली, गोंदे, मुसळगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
दोन दिवसांपूर्वी गोंदे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षभरात दोन मुलांना व अनेक जनावरांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. यामुळे वनविभागाने परिसरात बिबट्या पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले आहेत.