सिन्नर : सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावातील थोरात वस्ती येथे रविवारी दिनांक ७ रोजी सायंकाळी भीषण घटना घडली. सारंग गणेश थोरात (वय १०) हा आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.
या घटनेनंतर मुलाला गंभीर अवस्थेत तत्काळ वन विभागाच्या पथकाने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलगा घराच्या मागे इतर मुलांसोबत लपाछपी खेळत असताना बिबट्याने झडप घालून हा हल्ला केल्याचे समजते. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाने तातडीने पंचाळे गावात पिंजरा लावला असून बिबट्याचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे थोरात वस्ती तसेच पंचाळे परिसरात शोककळा पसरली आहे.