नाहीक : साधू महान्तांशी कुंभमेळा नियोजनावर चर्चा करताना कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Sadhugram : साधूग्रामसाठी कायमस्वरूपी भू संपादन करा

कुंभमेळा आयुक्तांकडे साधू महंत यांची मागाणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा हा दर बारा वर्षाने होणारा मेळा आहे. त्यामुळे साधूग्रामसाठी कायमस्वरूपी भू संपादन करून द्यावी अशी मागणीसह अनेक मागण्या साधू महंत यांनी केली. अपघातमुक्त, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करीत हरित करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी साधू, महंत यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. त्यांच्या सूचनांची निश्चितच दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे आज सकाळी रावसाहेब थोरात सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, महंत भक्ती चरणदास महाराज, सतीश शुक्ल, महंत रामकृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, श्री. देवबाबा, श्री. गौरीश गुरुजी आदी उपस्थित होते.

रस्ते, महामार्गांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांची क्षमता वाढविण्यात येत आहे, तर नाशिक विमानतळाची क्षमता वाढविण्यात येत आहे. नाशिक परिक्रमा मार्गासाठी भूसंपादनाच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. हे सर्व रस्ते भाविकांच्या सुविधेसाठी गुगलबरोबर जोडण्यात येतील. भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी गंगापूर धरण परिसर, समृद्धी महामार्ग, त्र्यंबकेश्वर- जव्हार मार्ग परिसरात टेन्ट सिटीचे नियोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी मल जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. कुंभमेळ्यातील या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी साधू, महंतांचे सहकार्य, मार्गदर्शन आवश्यक आहे. आपल्या सूचनांची निश्चितच दखल घेण्यात येईल. साधू ,महंतांच्या मागण्यांचा निश्चित सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले. तपोवनातील एकही जुना वृक्ष काढण्यात येणार नाही. एवढेच नव्हे, तर ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे त्यांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यात येईल. या बरोबरच नव्याने लागवड होणाऱ्या वृक्षांचे सवंर्धन करण्यात येईल, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले. या निर्णयाचे उपस्थित साधू- महंतांनी स्वागत केले.

२०२७ पर्यंत होणार हे कामे पूर्ण

नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू झाली आहेत. साधूग्रामकरीता भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. नाशिक येथे ११५३, तर त्र्यंबकेश्वर येथे २२० एकर क्षेत्र भूसंपादनाचे नियोजन आहे. साधूग्राममध्ये रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलिस चौकी, सीसीटीव्ही यंत्रणा, वीज, वॉटर एटीएम, हॅण्ड वॉश, पार्किंग, स्वस्त धान्य दुकान, गोदाम, टपाल, अन्न विक्री केंद्र, माध्यम केंद्र, संस्कृती केंद्र, सर्किट हाऊस, महाराष्ट्र मंडपम आदींसह आवश्यक मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येईल. ही सर्व कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण होतील.

या कामना झाली सुरुवात

आयुक्त सिंह यांनी सांगितले की, कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. भाविकांच्या सुविधेसाठी घाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून रामकाल पथच्या कामास सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुंभ डिजिटल करण्याचा मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.

साधू महंतांच्या मागण्या

यावेळी साधू- महंतांनी साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन उपलब्ध करून द्यावी, भू संपादनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आखाडा प्रमुखांशी संवाद साधावा, वस्त्रांतर गृह उभारावे, गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवावे, कायम स्वरुपी पोलिस चौकी उभारावी, कुंभमेळा शिखर समितीत प्रतिनिधीत्व मिळावे, साधूग्राममध्ये आवश्यक सोयीसुविधा वेळेत उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, सर्वतीर्थ टाकेद येथेही आवश्यक सुविधा द्याव्यात, भिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा, तपोवनातील वृक्ष तोडीचा वाद तातडीने सोडवावा, कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विकास कामांना गती द्यावी, तपोवन परिसरातील मंदिरांना धक्का लावू नये आदी मागण्या केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT