Nashik Simhastha Kumbh Mela 
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 5-स्तरीय 'दूरसंचार कवच' नो 'कम्युनिकेशन ब्लॅकआउट'!

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने १२ कोटी भाविकांच्या अपेक्षित गर्दीच्या दृष्टीने दूरसंचार व्यवस्थेचे नियोजन केले आहे. नाशिकमध्ये अमृतस्नानासाठी १.५ कोटी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ७५ लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या काळात मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर मोठा ताण येण्याची शक्यता असल्याने नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून पाचस्तरीय दूरसंचार कवच उभारण्यात येणार आहे.

अमृतस्नानाच्या दिवशीही 'कम्युनिकेशन ब्लॅकआउट' होऊ नये, प्रत्येक भाविक संपर्कात राहावा, प्रत्येक घटना प्रशासनाच्या निदर्शनास आणि प्रत्येक अधिकारी संपर्कात राहावा, या उद्देशाने दूरसंचार कवच उभारणार आहे. या दूरसंचार आराखड्यात पहिल्या स्तरावर सार्वजनिक मोबाइल नेटवर्कची क्षमता वाढवणार आहे.

दुसऱ्या स्तरावर प्रशासकीय व कार्यान्वयनासाठी खासगी आणि स्वतंत्र संपर्क व्यवस्था असेल. तिसऱ्या स्तरावर पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन या यंत्रणांसाठी मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. चौथ्या स्तरावर व्यवस्थापित वायफाय आणि सेवा हमी तर पाचव्या स्तरावर आयपी/फायबर बॅकहॉल आणि उपग्रह संप्रेषणाचा पर्यायी आधार राहणार आहे.

ही व्यवस्था डिजिटल महासिंहस्थाच्या एकात्मिक यंत्रणेचा कणा असेल.
सीसीटीव्ही, वाहनांचे जीपीएस, वाहतूक व पूरस्थिती सेन्सर्स, ड्रोन-अँटी ड्रोन यंत्रणा, पार्किंग कॅमेरे, आपत्कालीन कॉल बॉक्स आणि सार्वजनिक उद्घोषण व्यवस्था एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्राशी जोडली जाणार आहे.

भाविकांसाठी प्रस्तावित 'कुंभदूत' एआय सहाय्यकाद्वारे घाट, मार्ग, पार्किंग, वाहतूक, आरोग्य सुविधा, हरवले-सापडले केंद्र, निवास, रेल्वे-बस, हवामान, गर्दी आणि आपत्तीविषयक माहिती उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

"संपर्क व्यवस्था ही सुविधा नसून अत्यावश्यक पायाभूत सुविधा आहे. अमृतस्नानाच्या सर्वाधिक गर्दीच्या दिवशीही ती सक्षम राहावी, यासाठी पाचस्तरीय दूरसंचार आराखडा तयार करत आहे. यात सार्वजनिक मोबाइल नेटवर्क, खासगी नेटवर्क, मिशन-क्रिटिकल कम्युनिकेशन, मॅनेज्ड वाय-फाय आणि फायबर-सॅटेलाइट बॅकअपचा समावेश आहे."
— शेखर सिंह, आयुक्त, नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT