Land Records Recruitment Pudhari
नाशिक

Nashik Kumbh Mela 2027 Railway| कुंभमेळ्याचा मार्ग मोकळा; नारायणगावात रेल्वेसाठी भूसंपादन पूर्ण

Nashik Kumbh Mela 2027 Railway| पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कंबर कसली आहे.

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कंबर कसली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला. नारायणगाव (ता. निफाड) येथील भूसंपादनाची प्रक्रिया मंगळवारी (दि. २४) यशस्वीपणे पूर्ण झाली.

विशेष म्हणजे, तब्बल २५ शेतकऱ्यांनी या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामासाठी सकारात्मक सहकार्य दाखविल्यामुळे रेल्वेच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दि. १४ जुलै ते २५ सप्टेंबर २०२७ या काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे.

या काळात देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन ट्रॅक आणि अतिरिक्त प्रवासी सुविधा निर्माण करण्यासाठी भुसावळ विभागाने महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे.

याच आराखड्याचा भाग म्हणून नारायणगाव येथील जमिनीची अत्यंत आवश्यक होती. मंगळवारी झालेली ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि समन्वयपूर्ण वातावरणात पार पडली. यात ६५७, ६५८ आणि ६५९ या तीन गटांमधील जमिनीचा समावेश आहे.

रेल्वे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि २५ जमीनमालक शेतकरी यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे कोणत्याही वादाविना हे हस्तांतरण पूर्ण झाले. एरवी भूसंपादनावरून होणारे वाद पाहता, नारायणगावातील हा प्रकार प्रशासकीय कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

आपल्या हक्काची जमीन सार्वजनिक हितासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या योगदानाचे रेल्वे प्रशासनाने विशेष कौतुक केले आहे. या सहकार्यामुळेच २५ पुढील विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाल्यास कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होईल, ज्यामुळे गर्दीचे नियोजन करणे अधिक सोपे जाणार आहे.

लवकरच होणार कामाला सुरुवात

रेल्वेची क्षमता वाढल्याने भाविकांना जलद आणि सुरक्षित प्रवासाची सोय होईल. या नवीन सुविधांमुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. नाशिक परिसरातील रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. नारायणगावातील भूसंपादन पूर्ण होणे हा आगामी सिंहस्थाच्या तयारीतील 'मैलाचा दगड' मानला जात आहे. रेल्वे प्रशासन आता या जमिनीवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे. २०२७ पूर्वी सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार भुसावळ रेल्वे विभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT