

नाशिक : निखिल रोकडे
अहिल्यानगरपासून शिर्डीपर्यंत पसरलेल्या खरात प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले असून, तपासादरम्यान पोलिस पथकावर दबाव, गूढ व्यवहार, तरुणींशी संबंधित गंभीर आरोप आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे संशयास्पद व्यवहार अशा अनेक बाबी समोर येत आहेत.
नोकरी जाण्याची शक्यता असतानाही पोलिस अधिकारी सत्य उघड करण्यासाठी ठाम उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे, तर दुसरीकडे शिर्डीत कॅप्टन अंकलच्या नावाने सुरू असलेल्या गूढ हालचाली, अर्ध्या किमतीत जमीन व्यवहार आणि हॉटेल-लॉन्समधील कथित भागीदारीमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे.
दरम्यान, काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्ट करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास आणि सत्य उघड होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिक व अहिल्यानगरमधील महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणी गाजत असलेल्या खरात प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस यंत्रणेत धाडस, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे एक वेगळेच उदाहरण समोर आले आहे.
तपासाची व्याप्ती वाढत असताना आणि प्रकरण अधिक संवेदनशील बनत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत विचारले 'या तपासामुळे तुमची नोकरीही जाऊ शकते, तरी तुम्ही या पथकात राहण्यास तयार आहात का?' या प्रश्नाला पथकातील अधिकाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता ठाम उत्तर दिले 'नोकरी गेली तरी चालेल, पण आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय थांबणार नाही.
आमचे कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.' या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्याकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खरात प्रकरणातील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या शहानिशेच्या नावाखाली मूळ प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पुढे आला आहे.
विशेषतः अहिल्यानगरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि त्यांच्या तपास पथकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे काही धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले. पोलिसांनी जप्त केलेल्या काही व्हिडिओंमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले. या व्हिडिओंच्या आधारे प्रकरण केवळ साधे नसून त्यामागे मोठे जाळे असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
त्यामुळे तपास पथकाने कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला न जुमानता सत्य बाहेर आणण्याचा निर्धार केला. १८ फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलिस ठाण्यात एका तरुणीने नीरज जाधवविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीमागे भोंदू खरातच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानेच संबंधित तरुणीला पोलिसांकडे जाण्यास प्रवृत्त केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी नीरज जाधवला तत्काळ अटक न करता उलट तक्रारदार तरुणीचीच चौकशी सुरू केल्याचे लक्षात आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी यामध्ये हस्तक्षेप केला.
त्यांनी पोलिसांना फोनवरून जाब विचारत कडक शब्दांत सूचना दिल्या. तसेच १३ मार्च रोजी महिला आयोगाकडून अधिकृत मेल पाठवण्यात आला. त्यानंतर १७ मार्च रोजी आयोगात विशेष सुनावणी घेण्यात आली, ज्यामध्ये अहिल्यानगर पोलिसांना धारेवर धरल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले.
आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
एकीकडे दबाव, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय हस्तक्षेपाचे वातावरण असताना दुसरीकडे तपास पथकाने दाखवलेली निष्ठा आणि धैर्य विशेष लक्षवेधी ठरत आहे. 'नोकरीपेक्षा कर्तव्य मोठे' या भूमिकेतून काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी तपास प्रक्रियेला वेग देत सत्य उघड करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.