सिंहस्थातील साफसफाईचे आऊटसोर्सिंग 
नाशिक

Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थातील साफसफाईचे आऊटसोर्सिंग

पुढारी वृत्तसेवा
आसिफ सय्यद

नाशिक : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत मोठी नोकरभरती होईल, अशी आस लाऊन बसलेल्या बेरोजगारांचा अपेक्षाभंग होणार आहे. सिंहस्थकाळात साफसफाईचे आऊटसोर्सिंग केले जाणार असून, साधुग्रामसह भाविक मार्गांच्या स्वच्छतेसाठी तब्बल ६८३३ कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. सिंहस्थासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने १६७.७६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, यात बाह्ययंत्रणेमार्फत साफसफाईच्या कामासाठी सर्वाधिक ७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

सिंहस्थासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा

  • बाह्य मनुष्यबळामार्फत साफसफाई- ७९.२० कोटी

  • फिरते शौचालये- ४८.३० कोटी

  • साफसफाईकरीता वाहन व यंत्रसामग्री खरेदी- ६.१ कोटी

  • केरकचरा संकलन व वाहतुक करणे- २७.५५ कोटी

  • डस्टबीन खरेदी- २.७० कोटी

  • थ्री व्हिल बरोज खरेदी- १.८ कोटी

    निर्माल्य कलश खरेदी- ६० लाख

  • जंतूनाशके खरेदी- ८६ लाख

  • हार्डवेअर व बोहरीवाण साहित्य खरेदी- ६५ लाख

  • एकूण - १६७.७६ कोटी

  • साधुग्राममध्ये ८७०० तर भाविक मार्गांवर ८३०० तात्पुरती शौचालये

  • सिंहस्थ काळात शहरात एकूण ९६६ टन कचरा निर्मिती होणार

  • कचरा विल्हेवाटीसाठी घंटागाड्यांसाठी २७.५५ कोटींची तरतूद

  • कचऱ्यासाठी ४५०० डस्टबिन खरेदी करणार

    कचरा वाहून नेण्यासाठी १५०० थ्री व्हिल बरोज

  • ठिकठिकाणी ५०० निर्माल्य कलशाची व्यवस्था करणार

  • जंतूनाशके फवारणीसाठी ८६ लाखांची तरतूद करणार

२०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये सुमारे चार लाख साधुसंत व सुमारे दोन कोटींहून अधिक भाविक, पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. या साधु-महंत व भाविकांना सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेची असणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले असून, प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला असून, त्यावर अंतिम हात फिरवण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे. सिंहस्थात साधु-महंत, भाविक तसेच नाशिकमधील नागरिकांच्या आरोग्य रक्षणाची बाब महत्वपूर्ण ठरणार असल्याने स्वच्छताविषयक कामांसाठी या आराखड्यात घनकचरा विभागाकरिता १६७.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ७९.२० कोटींचा खर्च हा बाह्ययंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या कामावर केला जाणार आहे. २०१५-१६मध्ये पार पडलेल्या सिंहस्थात स्वच्छतेच्या कामासाठी ३३११ कंत्राटी सफाई कर्मचारी नियुक्ती करण्यात आले होते. यंदा भाविकांची संख्या अधिक वाढणार असल्याने कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार असून ६८३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

साधुग्रामच्या साफसफाईसाठी ५७२२ कर्मचारी 

४५ ते ९२ दिवसांकरिता या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या स्वच्छतेसाठीच सर्वाधिक ५७२२ कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यामध्ये साधुग्रामच्या १ ते ९ ब्लॉकमध्ये तीन सत्रात साफसफाईकरिता ३१६८ कर्मचारी, १२,६७२ शौचालयांच्या साफसफाईकरीता १३९४ कर्मचारी, १५,८४० स्नानगृहांच्या स्वच्छतेसाठी ७१३ कर्मचाऱ्यांची ९२ दिवसांकरीता कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली जाणार आहे. साधुग्राममध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर तब्बल ६४.८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भाविक मार्गांच्या स्वच्छतेसाठी उर्वरित १६९० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

१७,००० तात्पुरती शौचालये, २५० स्नानगृहे

गत सिंहस्थात स्त्रियांकरिता १२८०, पुरूषांकरिता ११७० तात्पुरती शौचालये, ३२५ मूतारींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आगामी सिंहस्थाकरीता साधुग्राममध्ये स्त्रियांकरिता ४७१० तर पुरूषांकरिता ३८५५ तात्पुरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथीयांकरिता देखील १३५ स्वतंत्र तात्पुरती शौचालये अशाप्रकारे ८७०० तात्पुरती शौचालये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय २५० स्नानगृहांची व्यवस्था देखील केली जाणार आहे. याशिवाय भाविक मार्गांवर ८३०० तात्पुरती शौचालये उपलब्ध असणार आहेत. यावर ४८.३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

साधुग्राममध्ये ११६ टन कचरा निर्माण होणार

सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रातून दररोज ७५० टन कचरा गोळा करून घंटागाड्यांद्वारे खतप्रकल्पावर विल्हेवाटीसाठी नेला जातो. २०२७ पर्यंत शहरातील कचऱ्यांचे प्रमाण प्रतिदिन ८५० टनापर्यंत जाईल. सिंहस्थ काळात तिन्ही पर्वणींच्या ९२ दिवसांच्या काळात साधुग्राममध्ये दररोज ११६ टन कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सिंहस्थकाळात शहरातील एकूण कचऱ्याचे प्रमाण ९६६ टनापर्यंत जाईल. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी अंदाजित ३१०० रुपये प्रति टन दराने घंटागाड्यांना दर अदा केला जाणार आहे. यासाठी २७.५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT