Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

२०२७ च्या कुंभमेळ्यासाठी नाशिक प्रशासनाची तयारी सुरु
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027file photo

नाशिक : विधान परिषद निवडणुकीचे सूप वाजताच विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम हे ॲक्शन मोडवर आले आहेत. गेडाम यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात सोमवारी (दि. ८) बैठक बोलविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ३ वाजता होणाऱ्या बैठकीत संबंधित विभागांच्या वरिष्ठांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Summary

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात सोमवारी (दि. ८) बैठक पार पडणार आहे. याबद्दल विभागीय आयुक्त घेणारा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या वरिष्ठांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाकडून सिंहस्थच्या नियोजनावर भर देण्यात येणार आहे. २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील पाच कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे थंडावलेले काम पुन्हा सुरु झाले आहे.

सन २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या कुंभात देश-विदेशातून पाच कोटी भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने सिंहस्थाचे नियोजनावर भर दिला आहे. परंतु, मध्यंतरीच्या काळात लोकसभा व त्यानंतर विधान परिषद शिक्षक निवडणुकांच्या आचार संहितेमुळे कामकाज काहिसे थंडावले होते. मात्र, शिक्षक निवडणूक पार पडताच प्रशासन पुन्हा एकदा कुंभमेळ्याच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. विभागीय आयुक्त गेडाम यांनी कुंभाच्या तयारीत लक्ष घातले आहे. कुंभाच्या नियोजनाशी निगडीत यंत्रणांची बैठक बोलविली आहे.

नाशिक शहरात कुंभाच्या दृष्टीने करावयाच्या विकास कामांसाठी महापालिकेने १५ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. आराखड्यात रिंगरोड, नवीन रस्ते, प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती, वाहनतळ, तात्पूरते निवारागृह, साधुग्राम आदी कामांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महावितरण अशा विविध यंत्रणांही त्यांच्या स्तरावर आराखडे तयार करत आहेत. सर्व यंत्रणा मिळून सुमारे ३ ते साडेतीन हजार कोटी रुपयांची मागणी केली जाऊ शकते. त्यानुषंगाने आयुक्त गेडाम यांनी बोलविलेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीत गेडाम तयारीसंदर्भात काय निर्देश देतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

गेडाम यांचा अनुभव कामी

२०१४-१५ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यावेळी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची धूरा प्रवीण गेडाम यांच्या हाती होती. त्याकाळी गेडामांच्या दृरदृष्टीतून शहरातील रस्ते, रिंगरोडसह निरनिराळे विकासकामे उभी राहिली. गेल्या सिंहस्थातील गेडाम यांच्या अनुभवाचा फायदा यंदाच्या नियोजनात कामी येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news