नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात येणाऱ्या आठ रस्त्यांवर २२ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यात पाच हजार बसेससह तब्बल ७० हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी २६३ हेक्टर जागेची आवश्यकता भासणार आहे. पेठ रोड, दिंडोरी रोड, धुळे रोड, पुणे रोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, मुंबई रोड, संभाजीनगर रोड आदी ठिकाणी या वाहनतळांची उभारणी प्रस्तावित आहे.
येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी जोरात सुरू आहे. कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये येणाऱ्या साधू - महंत व भाविकांना विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांनी आराखडे तयार केले असून, शासनाच्या मंजुरीने त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकेने सात हजार ७६७ कोटींचा आराखडा तयार केला आहे. प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकचा कुंभमेळा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ तयारी आढावा बैठक होऊन नियोजनाला चालना देण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेला वाहनतळांसह पार्किंगसाठीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग सुविधांसाठी नियोजन सुरू केले आहे. या अंतर्गत शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न देता नियोजित वाहनतळांवर वाहने पार्किंग करता यावी, यासाठी महापालिकेने हद्दीत २२ ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित केले आहेत. यामध्ये पेठ रोड, दिंडोरी रोड, धुळे रोड, पुणे रोड, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, मुंबई रोड, संभाजीनगर रोड आदी ठिकाणी वाहनतळांची उभारणी प्रस्तावित आहे.
महापालिकेने वाहनतळांसाठीचा आराखडा तयार केला आहे. वाहनतळांसाठी २६३ हेक्टर जागेची मागणी नोंदवली जाणार आहे. या जागेवर जवळपास ५,४२३ बसेस आणि ६९ हजार २० वाहने उभी राहू शकणार आहे. गत कुंभमेळ्यात पेठ रोड, गंगापूर रोड, खंबाळे, राजूरबहुला, शिलापूर, मोहशिवार, दिंडोरी रोड आदी ठिकाणी वाहनतळांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणांचाही अभ्यास केला जात आहे. वाहनताळांबरोबरच निवारा शेडही उभारली जाणार आहेत.
मार्ग- आवश्यक क्षेत्र (हेक्टर)
धुळे रोड- ६४
छत्रपती संभाजीनगर रोड- ३०
गंगापूर रोड- १०.५
पुणे रोड- २५
त्र्यंबक रोड- १९
मुंबई रोड- १७
पेठ रोड- ४५
दिंडोरी रोड- ३७.५०
एकूण- २६३