

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वाहतूक कक्षाने २९ ऑनस्ट्रीट आणि ६ ऑफस्ट्रीट अशा ३५ वाहनतळांचा समावेश असलेला आराखडा तयार केला आहे. एकावेळी ४,८६५ वाहने पार्क करता येतील, अशी सुविधा असलेल्या या वाहनतळांसाठी दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी पाच, चारचाकीसाठी दहा, तर टेम्पो वा बस यासारख्या वाहनांसाठी वीस रुपये इतका प्रतितास दर असणार आहे.
वाढती वाहतूक कोंडी नाशिकच्या लौकिकास धक्का देणारी ठरली आहे. शहरातील प्रामुख्याने बाजारपेठेचा परिसर असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, पंचवटी कारंजा, शालिमार, सीबीएस, त्र्यंबकनाका, महात्मानगर, कॉलेजरोड आदी भागांत वाहन पार्किंगसाठी जागाच नाही. परिणामी, बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने वाहतूक कोंडीस निमंत्रण देतात. मध्यंतरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्यानंतर संपूर्ण शहरांमधील वाहतुकीचा मुद्दा चर्चेत आला.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नाशिकमध्ये धाव घेत महापालिका, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटीच्या काळात प्रलंबित राहिलेल्या स्मार्ट पार्किंगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रॅफिक सेलने आराखडा तयार केला असून, कोणत्या वाहनतळावर किती वाहने एका वेळेस बसू शकतील तसेच त्यांच्याकडून साधारणपणे किती भाडे आकारणी केली जावी, त्यासाठी मॉडेल तयार केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये कोणत्या वाहनासाठी प्रतितास किती दर करायचे याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दुचाकीसाठी पाच, चारचाकीसाठी दहा आणि मोठ्या वाहनांसाठी वीस रुपयांची आकारणी प्रस्तावित आहे. मात्र, एका तासापेक्षा अधिक काळ वाहन उभे राहत असेल तर त्याचे भाडे किती घ्यायचे या संदर्भात निर्णय प्रलंबित आहे.
कुलकर्णी गार्डन साधू वासवानी रोड, कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल ऑफिस, ज्योती स्टोअर ऋषिकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका, प्रमोद महाजन उद्यान प्रवेशद्वार, गंगापूर नाका ते जेहान सर्कल दोन्ही बाजूने, जेहान सर्कल ते गुरुजी हॉस्पिटल, जहान सर्कल ते एबीबी सर्कल, गुरुजी हॉस्पिटल ते पाइपलाइन रोड, मोडक पॉइंट ते खडकाळी रोड, थत्तेनगर रोड, कुलकर्णी उद्यानामागे, श्रद्धा पेट्रोलपंप ते वेस्टसाइड मॉल, सीबीएस ते शालिमार, कॅनडा कॉर्नर ते विसे मळा, गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर, मॉडेल कॉलनी चौक ते भोसला गेट, पंडित कॉलनी पालिका इमारत, शालिमार ते नेहरू गार्डन, एचडीएफसी चौक ते एमएसईबी ऑफिस, छत्रपती शिवाजी पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळा नाशिकरोड, महात्मा गांधी रोड, कॅनडा कॉर्नर ते पॅनासाॅनिक गॅलरी, बिटको सिग्नल ते महात्मा गांधी रोड, जेहान सर्कल ते न्रेलेकर सरकार, शहीद सर्कल ते मॉडेल कॉलनी सर्कल, पशुवैद्यकीय दवाखाना, अशोक स्तंभ, निमाणी चौक ते चित्रकूट, सिव्हिल हॉस्पिटल ते जलतरण तलाव, सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल.
बीडी भालेकर शाळा मैदान, अण्णा शास्त्री, मेन रोड, अॅगोरा कॉम्प्लेक्स, शताब्दी हॉस्पिटल, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, पंचवटी, मुंबई नाका ट्रँगलर स्पेस
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहनतळांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. २९ ऑनस्ट्रीट आणि ६ ऑफस्ट्रीट वाहनतळांची उभारणी केली जात असून, त्यात ४,५६५ वाहने एकाच वेळी लावणे शक्य होणार आहे. वाहनांसाठी प्रतितास किती दरा करायचे याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक.