नाशिक : सिंहस्थ कुंभमेळाच्या बैठकीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पुढारी न्युज चे प्रतिनिधी किरण ताजणे यांना मारहाण करणाऱ्या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. उर्वरित संशयित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून प्रकरणाचा तपास करणारे उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांनी या पार्किंग माफियायांचे अवैध धंदे नष्ट करण्याच्या दृष्टीने मोठी मोहीम उघडली आहे.
त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ कमानीजवळ पुढारी न्युज चे प्रतिनिधी किरण ताजणे व माध्यम प्रतिनिधी योगेश खरे,अभिजीत सोनवणे यांच्यावर पार्किंग माफियांकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ताजणे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी गंभीर दाखल घेतली. पार्किंग ठेकेदार व मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या आदेश जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासन विभागाने पार्किंग माफियांच्या विरुद्ध आता मोहीम सुरू केली आहे. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या पाचही आरोपींवर तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न व पत्रकार संरक्षण कलम अंतर्गत त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.