इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी त्या आयटी कंपनीविरोधात भाजप व भाजप युवा मोर्चातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांवरील कथित शोषण, धर्मांतराचा दबाव आणि कंपनीतील वाढत्या शिस्तभंगाच्या प्रकारांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान भाजयुमोच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत, मुख्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या ठिकाणी कोणताही जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट भूमिका घेतली की, दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत निवेदन देणे योग्य नाही. फक्त जबाबदार आणि मुख्य अधिकाऱ्यांनाच निवेदन देण्यात येईल.
संबंधित मुख्य अधिकारी उपस्थित झाल्यानंतरच कंपनीला निवेदन देऊन त्यांना कठोर शब्दांत जाब विचारला जाईल, असा इशारा देण्यात आला. कार्यकत्यांनी सांगितले की, कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. व्यवस्थापनाची निष्क्रियता स्पष्ट दिसून येत आहे. याशिवाय कंपनी परिसरात बेशिस्त वर्तन, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व अनधिकृत पार्किंग यांसारख्या प्रकारांबाबतही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या कथित कॉर्पोरेट जाळ्याविरोधात रस्त्यावर उतरत अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते सुनील फरांदे, सरचिटणीस सुनील देसाई, नगरसेवक श्याम बडोदे, अॅड. अजिंक्य साने, सुनील खोडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, सचिन कुलकर्णी, रश्मी हिरे,
भाजयुमो अध्यक्ष प्रवीण भाटे यांच्यासह प्रशांत वाघ, पवन उगले, हर्षद जाधव, निखिल खोडे, तुषार नाटकर, हर्षल आहेर, निखिल पाटील, सिद्धेश संचेती, रोहन कानकाटे, प्रमित सानप, अमोल हिंगमिरे, संकेत खोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा झाली असून, कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ भूमिका स्पष्ट करीत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कॉपोरेट जाळ्याचा संशय
भाजयुमोतर्फे असेही नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणात एखाद्या कॉर्पोरेट जाळ्याचा संशय आहे. त्याच्या मुळापर्यंत जाऊन संपूर्ण साखळी उघडकीस आणली पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही आणि संपूर्ण यंत्रणेचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला.