Nashik Infant Mortality Rate 2026 Pudhari
नाशिक

Child Death Rate | नाशिक जिल्ह्याचा मोठा विजय! 14 वर्षांत बालमृत्यूचा दर 14 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर; प्रशासकीय प्रयत्नांना यश

Child Death Rate | दरवर्षी सातत्याने बालमृत्यू दर होतोय कमी : बिगर आदिवासी तालुक्यातील बालमृत्यू चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विकास गामणे

जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात असून, गत काही वर्षांत जिल्हा परिषद प्रशासनाला बालमृत्यू कमी करण्यात चांगले यश आले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यूचे प्रमाण घटत असले, तरी अद्यापही पूर्णपणे कमी झालेले नाही.

नाशिक जिल्ह्यात २०११-१२ या आर्थिक वर्षात असलेला १४ टक्के बालमृत्यू दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे, गत १४ वर्षात ९ लाख ७५ हजार २२३ बालकांचा जन्म झाला असून, यातील ७०५ (शून्य ते पाच वर्षांपर्यंत) बालकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

आदिवासी भागांसह बिगर आदिवासीसारख्या सधन तालुक्यात वाढलेले बालमृत्यू चिंताजनक आहेत. त्यामुळे येत्या काळात बालमृत्यू दर शून्य करण्याचे ध्येय प्रशासनाने निश्चित केले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्हा आदिवासी आणि बिगर आदिवासी तालुके येतात. यात आदिवासी तालुक्यांमध्ये होत असलेल्या बालमृत्यूची चर्चा राज्यभर होत होती. हा मुद्दा विधिमंडळातही अनेकदा गाजला. मात्र, बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

या प्रयत्नांना यश येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गर्भवती मातांसह स्तनदा माता आणि बालकांसाठी अनेक योजनाही राबविल्या जात आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानासह स्तनपान व पोषण अभियानाचा हा सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. जि. प. आरोग्य विभागातर्फे महापालिका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बालकांच्या मृत्यूची नोंद ठेवली जाते. आरोग्य विभागाने राबविलेल्या सुविधांमुळे बालमृत्यूच्या दरात घट झाली आहे.

जिल्हा परिषदेकडून विशेष नियोजन

जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषद विशेष उपक्रम राबवित आहे. यासाठी आयआयटी मुंबईसह गरोदर आणि स्तनदा मातांना प्रशिक्षण दिले जात आहे. बालकांची कोणती काळजी घ्यावी, याबाबत समुपदेशन करण्यात आले. आशासेविका, अंगणवाडीसेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

कमी वजनामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्यामुळे बालकांचे पोषण व्हावे, यासाठी पोषण पुनर्विकास केंद्रही उभारण्यात आले आहे. याचबरोबर आदिवासी तालुक्यांसह नांदगाव तालुक्यात मानवविकास शिबिरेही घेतली जात असून, या माध्यमातून माता आणि बालक दोघांचीही आरोग्य तपासणी केली जाते.

बिगर आदिवासी तालुक्यातही बालमृत्यू ?

नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी यांसारख्या काही दुर्गम व आदिवासी पट्ट्यात बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र, या तालुक्यातील बालमृत्यूचा दर घटत आहे.

दुसरीकडे मात्र, बिगर आदिवासी तालुक्यांमधील बालमृत्यू वाढत असल्याचे दिसत आहे. या भागांतील आरोग्यसेवा, वाहतूक, पोषण आणि तत्काळ उपचार यंत्रणा अनेकदा मर्यादित असल्याचे प्रश्न वारंवार पुढे येत असतात. त्यामुळे अशा भागांतील बालमृत्यूंचे प्रमाण वेगळे तपासण्याची गरज असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT