सिडको (नाशिक) : नाशिकमध्ये उद्योगांच्या विकासासाठी पोषक वातावरण असून आयमा इंडेक्स महाकुंभला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मैत्री पोर्टलचा उद्योजकांनी जास्तीत जास्त वापर करावा. उद्योजकांच्या हिताच्यादृष्टीने नवीन उद्योग धोरण आणण्यात येणार असून त्यात १५ नवीन बाबींचा समावेश असेल, असे सुतोवाच उद्योग सचिव पी. अन्बलगन यांनी केले.
आयमातर्फे दि. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान ठक्कर डोम येथे आयोजित आयमा इंडेक्स महाकुंभ-२०२५ च्या सादरीकरणाचा शुभारंभ उद्योग सचिव पी. अन्बलगन, उद्योग (विकास) आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल स्ट्रीट(गोविंदनगर) येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी पी. अन्बलगन बोलत होते. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित बुब, सरचिटणीस प्रमोद वाघ, आयमा इंडेक्स महाकुंभ २०२५ चेअरमन वरूण तलवार, स्पेस बुकींग कमिटी चेअरमन मनीष रावल आणि बीओपीपी कमिटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे होते.
ग्लोबल ब्रँड तयार करण्याची क्षमता नाशकात असल्याचे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी भाषणात सांगितले. त्यासाठी त्यांनी सुला वाईन्स आणि सह्याद्री ऍग्रोचे उदाहरण दिले. लघुउद्योगांना जास्तीत जास्त पाठबळ देण्याचं आश्वसनही त्यांनी दिले.
औद्योगिक विकासात उत्तर महाराष्ट्राचे आणि विशेषतः नाशिकचे योगदान मोलाचे आहे. गुंतवणुकीच्यादृष्टीने नाशिकला राज्यात अव्वल डेस्टिनेशन बनविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. झूममध्ये घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जलद व्हावी यासाठी उप समित्या नेमून त्याद्वारे निर्णय घेण्याच्या नाशिक पॅटर्नची राज्यभर चर्चा सुरू असून अनेक जिल्ह्यांनी हा कित्ता गिरविल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, जे. आर. वाघ, एस. एस. बिर्दी, संदीप सोनार, राजेंद्र अहिरे, बिपिन बटाविया, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, सचिव योगिता आहेर, खजिनदार गोविन्द झा, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, रवींद्र महादेवकर, सुमीत बजाज, कुंदन डरंगे, राजेंद्र वडनेरे, राजेंद्र कोठावदे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, रवी शामदासांनी, विनोद कुंभार, श्वेता चांडक, मनोज मुळे, नागेश पिंगळे, रंजीत सानप, सुरज आव्हाड, प्रतीक पगारे, सुमित तिवारी, शरद दातीर, कमलेश उशीर, योगेश पाटील, जय महाजन तसेच स्टॉल धारक व उद्योजक व विविध संघटनांचे प्रतिनिधी, मनपा, एमआयडीसी, डीआयसी व विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी प्रास्ताविक केले. ठक्कर डोम येथे विस्तीर्ण जागेत होणाऱ्या औद्योगिक महाकुंभमध्ये ३५० पेक्षा अधिक वातानुकूलित स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. देश विदेशातील अनेक उद्योजक यात सहभागी होतील. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक स्टॉल्सचे बुकिंग झाले आहे. उद्योजकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे बुब यांनी यावेळी नमूद केले.