

सिडको (नाशिक) : राजेंद्र शेळके
मुंबई- आग्रा महामार्गावरील मुंढेगाव लॉजिस्टिक हब उभारणीसाठी सोयीस्कर आणि महत्त्वाचे ठिकाण ठरू शकते अशी माहिती उद्योग सचिव पी. अन्बलगन यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली. मुंढेगाव परिसर नाशिक शहराच्या नजीक असून, अंबड व सातपूर या महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतीजवळ आहे. या दोन वसाहतींमध्ये देश -विदेशातील अनेक अग्रगण्य कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उद्योग उत्पादन, वाहतूक व निर्यात व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आधुनिक लॉजिस्टिक्स हबची गरज भासते. याच दृष्टीने मुंढेगाव आदर्श ठिकाण ठरेल असे अन्बलगन म्हणाले.
मुंबई- आग्रा महामार्ग राज्यातील उद्योग व व्यापारासाठी महत्त्वाचा दुवा आहे. या महामार्गावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, गुजरात यांच्या संपर्कासाठी ही जागा सोयीस्कर ठरते. प्रस्तावित लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक उद्योगांना वाहतूक सुविधा मिळून वेळ व खर्च वाचेल. मुंढेगाव येथे लॉजिस्टिक्स पार्क साकारल्यास केवळ नाशिकच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना त्याचा लाभ होईल. माल साठवण, थंडगार कोठारे, वितरण व आयात- निर्यात सेवा एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी केला.
मुंढेगाव हे अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीजवळ आहे. त्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क साकारल्यास उद्योजकांना फायद्याचे ठरणार आहे.
ललीत बुब, अध्यक्ष, आयमा
उद्योग उत्पादन, वाहतूक व निर्यात व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आधुनिक लॉजिस्टिक्स हबची गरज आहे. मुंढेगाव येथे लॉजिस्टिकस पार्क झाले पाहिजे.
दिलीप वाघ, उद्योजक, अंबड
मुंढेगाव येथे लॉजिस्टिकस पार्क झाल्यास परिसराचा विकास होऊ शकतो. रोजगार उपलब्ध होतील. समृद्धी महामार्गजवळ आहे. नाशिक येथील उद्योग क्षेत्राला फायदा होईल.
ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष, आयमा