उद्योगमंत्री उदय सामंत file photo
नाशिक

Nashik Industry News | 'महिंद्रा' नाशिकमध्येच राहणार - उद्योगमंत्री उदय सामंत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अडीच हजार कोटींच्या औद्योगिक विस्तारीकरणांतर्गत मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा कंपनीला उद्योगासाठी नाशिकमध्ये फास्ट ट्रॅकवर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यासंदर्भात लवकरच आनंद महिंद्रा यांच्याशी पालकमंत्र्यांसमवेत भेट घेणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर महायुतीच्या बैठकीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. 12) नाशिकमध्ये आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Mahindra Company will be provided space on fast track in Nashik for industry.)

मंत्री सामंत म्हणाले, गत दोन दिवसांपासून नाशिकचा महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा प्रकल्प गुजरातला जाणार असे फेक नॅरेटिव्ह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पसरविले जात आहे. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे महिंद्रा कंपनीनेच दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. महिंद्रा कंपनी नाशिकमधून कुठेही जाणार नाही, हे सांगण्यासाठीच मी नाशिकमध्ये आलो आहे. सद्यस्थितीत नाशिक एमआयडीसीत अडीच हजार कोटींच्या प्रकल्पांचे विस्तारीकरण करण्यावर महायुती सरकार भर देत आहे. नाशिकमधील उद्योगांच्या विकासासंदर्भात लवकरच मुंबईत उद्योजकांसमवेत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. उद्योगांना महाविकास आघाडी सरकार अन महायुती सरकारने काय दिले, दोघांचे उद्योगमंत्री नाशिकमध्ये किती वेळा आले अन‌् उद्योजकांची किती कामे केली याबाबत उद्योजकांनी खरे काय ते जनतेला सांगावे.

नाशिकच्या उद्योगांना सबसिडी

उद्योगांना 3 रुपयांपर्यंत वीजसबसिडी देण्याचा अधिकार कॅबिनेट सबसिडी कमिटीला असून, नाशिकच्या उद्योगांना सबसिडी देण्यात आली आहे. उद्योजकांना सुविधा काय द्यायच्या यासंदर्भात कॅबिनेट कमिटीत निर्णय होत असतात. त्यानंतरच सुविधांच्या आधारे कुठली इंडस्ट्री त्या शहरात आणता येईल, यावर शिक्कामोर्तब केले जाते. नाशिकच्या एमआयडीसीअंतर्गत रस्त्यांचे जाळे विणण्यात आले असून, उद्योगांसाठी निरोगी वातावरण असल्याचा उल्लेखही त्यांनी शेवटी केला..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT