नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे मदर युनिट नाशिकला असतानाही कंपनीने करारबद्ध केलेला तब्बल २५ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला उभारण्याची तयारी सुरू केली आहे. प्रारंभी हा प्रकल्प महाराष्ट्रात त्यातही नाशिकला उभारला जाईल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, अचानकच प्रकल्प गुजरातला उभारण्याची तयारी सुरू केल्याने, जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्प नाशिकला देण्याची मागणी केली जाणार आहे. (The office bearers of the industrial organizations will meet with the Chief Minister along with the Minister of Industries and demand that a project worth 25 thousand crores be given to Nashik.)
ऑटोमोबाइल क्षेत्रातील नामांकित कंपनी असलेल्या महिंद्रा ॲण्ड महिंद्राने चीनच्या शानक्सी ऑटोमोबाइल कंपनीशी कारनिर्मितीचा करार केला असून, त्यासाठी २५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. सध्या या दोन बड्या समूहातील कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मंजुरी प्राप्त होताच हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. प्रारंभी हा प्रकल्प राज्यात उभारला जाणार असल्याची चर्चा होती. त्यातही कंपनीचे मदर युनिट नाशिकला असल्याने प्रकल्प नाशिकमध्येच येईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्याबाबत चर्चा रंगल्याने, औद्योगिक संघटनांकडून प्रकल्प नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या प्रकल्पातून निर्यातकेंद्रित असेंबल्ड कार तसेच इंजिन आणि कार बॅटरीसाठी एकात्मिक उत्पादन केंद्र तयार होण्यास मदत होणार आहे.
महिंद्रा ॲण्ड महिंद्राने नाशकात १९८० मध्ये प्रकल्प उभारणीस सुरुवात केली. १९८१ पासून प्रकल्प सुरू झाला. अवघ्या ५० कामगारांपासून सुरू झालेल्या महिंद्रामध्ये २०२५ कायम कामगार असून, प्रशिक्षणार्थी १५०० तर कार्यालयीन कर्मचारी ७०० आहेत. २००६ मध्ये कंपनीत सर्वोच्च ३५०० कायम कामगार होते. या दोन कंपन्यांचे लहान-मोठे पार्ट बनविण्यासाठी, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेकडो छोटे-मोठे युनिट सुरू झाले. त्यातही अगदी एका कामगारापासून ते एक हजार कामगारांपर्यंत संख्या आहे. यातून हजारो रोजगार निर्माण झाले आहेत.
नाशिकमध्ये उद्योगस्नेही वातावरण असल्यानेआणि महिंद्राचे मदर युनिट नाशिकमध्ये असल्याने त्यांनी हा प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्यास प्राधान्य द्यायला हवे. सुरुवातीला याबाबतची चर्चाही होती. मात्र, अचानकच प्रकल्प गुजरातला जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्प नाशिकला आणण्याची मागणी केली जाईल.
धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा, नाशिक.